
भोर उपजिल्हा रुग्णालयाची आज होणार वीज खंडित
भोर, ता.१: येथील राज्य शासनाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे तीन वर्षाचे १० लाख ६२ हजार ७९० रुपयांचे वीज बिल थकल्यामुळे रुग्णालयाची वीजजोड तोडण्यात येणार आहे. गुरुवारी (ता. ३) सकाळी ११ वाजता रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. अशा आशयाची नोटीस महावितरणने वैद्यकीय अधीक्षकांना दिलेली आहे. रुग्णालयाचे वीज कनेक्शन सोडल्यामुळे आरोग्य सेवेस मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रुग्णालयात अंतर रुग्ण विभागात असलेल्या रुग्णांच्या आणि ग्रामीण भागातून प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या जीवितास धोका निर्माण होणार आहे.
रुग्णालयाची वीज तोडण्याबाबत यापूर्वी २५ जानेवारीला नोटीस दिली होती. मात्र, रुग्णालयास शासकीय निधी मिळाला नसल्यामुळे वीज बिल भरण्यात आले नाही, असे सांगत पुढील एका महिन्याच्या कालावधीत वीजबिल भरण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. परंतु अद्यापही वीज बिल न भरल्यामुळे महावितरणकडून वीज जोड बंद करण्यात येणार आहे.
दरम्यान, भोरच्या ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मोठ्या प्रमाणात दिल्या जाणाऱ्या भोरच्या उपजिल्हा रुग्णालयास निधी उपलब्ध करीत नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी शासनाबद्दल नाराजी व्यक्त केली.