
वरंधा घाटात दोन अपघात
भोर, ता. ८ : भोर- महाड मार्गावरील वरंधा घाटात बुधवारी (ता. ८) एका दिवशी झालेल्या दोन अपघातांमध्ये एका महिलेसह तिघेजण जखमी झाले.
पहिला अपघात सकाळी नऊच्या सुमारास हिर्डोशी येथे झाला. रत्नागिरीहून पुण्याकडे येणारी मारुती व्हॅन रस्त्याच्या डाव्या बाजूच्या डोंगरास धडकली. यामध्ये चालकासह एक महिला जखमी झाली. सुदैवाने ३ महिला व २ लहान मुलांना कोणतीही इजा झाली नाही. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जखमींपैकी चालकाची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरा अपघात दुपारी दोनच्या सुमारास देवघर गावच्या हद्दीत झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने इनोव्हा मोटार गटाराच्या संरक्षण भिंतीला धडकली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून, मोटारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दोन्ही अपघातांबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.