
भोर येथे पावणे दोन लाखांचा गुटखा जप्त
भोर, ता. ३० : शहरात विक्रीसाठी विनापरवाना आणलेला एक लाख ९१ हजार १६० रुपयांचा गुटखा भोर पोलिसांनी मंगळवारी (ता.२८) पकडला. यामध्ये विमल पानमसाला सुगंधी व विमल सुगंधित सुपारी यांचा समावेश आहे.
पोलिसांनी वाहतूक करणाऱ्या छोट्या टेंपोसह पाच लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी टेंपोचालक हसन सिराज शेख (वय. २८, कोंढवा, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास एसटी स्टॅंडवर पोलिस वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी पोलिसांना पाहून छोटा टेम्पोंचालक पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून शहरातील आमराई आळी परिसरात त्यास पकडले आणि टेंपोची झ़डती घेतली असता टेंपोत प्रतिबंधित अन्न पदार्थाचा माल असल्याचे निदर्शनास आले.
टेंपोत विमल पानमसाला सुगंधीच्या तीन गोण्यांमध्ये ५२ बंडल आणि विमल सुगंधीत सुपारीचे ५१ बंडल आढळून आले. बाजारात याची किमत एक लाख ९१ हजार १६० रुपये आहे. पोलिसांनी छोट्या हत्तीसह गुटखा जप्त केला. हा गुटखा भोरमध्ये कोणासाठी आणण्यात आला याबाबत पोलिस तपास करीत आहेत. पोलिस हवालदार सुनील चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक बळिराम सांगळे पुढील तपास करीत आहेत.