
बंदुकीची चोरी; तरुणास अटक
भोर, ता.२० : नानावळे (ता. भोर) येथील शिंदेवाडी वस्तीमधून बंदुकीची चोरी केल्याबद्दल संतोष रामचंद्र आखाडे (वय ३२, रा बुरुदमाळ, सांगवी) यास भोर पोलिसांनी बुधवारी (ता १९) रात्री अटक केली. त्याच्याकडून जंगलात लपवून ठेवलेली बंदूकही पोलिसांनी जप्त केली.
नानावळे शिंदेवाडी येथील कोंडिबा तुकाराम शिंदे यांच्या घरातील भारत स्मॅाल आर्मस प्रायव्हेट कंपनीची १२ बोअर सिंगल नळी असलेली काळ्या रंगाची बंदूक ५ एप्रिल रोजी रात्री चोरीला गेली. याप्रकरणी कोंडिबा शिंदे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक बळीराम सांगळे यांनी त्वरित तपास सुरू केला आणि संशयितांची चौकशी सुरू केली. संतोष आखाडे यालाही संशयित म्हणून ताब्यात घेतले. त्यास पॉलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने बंदूक चोरल्याचे कबूल केले. जंगलात लपवलेली बंदूकही त्याने आणून दिली. दरम्यान, गुरुवारी (ता.२०) सकाळी न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.