‘राजगड’च्या कामगारांना पुन्हा कामावर घेणार

‘राजगड’च्या कामगारांना पुन्हा कामावर घेणार

भोर, ता. २१ : राजगड सहकारी साखर कारखान्यातील कामगारांचे कामकाज तात्पुरते बंद केले असले; तरी त्यांच्या कामाचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. पुढील हंगामात सर्व कामगारांना कामावर घेणार असून, कामगारांचे पगार आणि इतर देणी देणे, ही आमची कारखान्याची जबाबदारी आहे,’’ असे कारखान्याचे अध्यक्ष व आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.

राजगड सहकारी साखर कारखान्यातील १५५ कायम कामगारांपैकी ३० कामगार कामावर असून, १२५ कामगारांचे काम तात्पुरते बंद ठेवले आहे. त्यामुळे विरोधकांकडून टीका केली जात आहे. याबाबत आमदार संग्राम थोपटे यांनी भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास संस्थेच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत कारखान्याची भूमिका स्पष्ट केली. यावेळी पोपटराव सुके, शैलेश सोनवणे, बाळासाहेब थोपटे, धनंजय वाडकर, विकास कोंडे, उत्तम थोपटे, सुभाष कोंढाळकर, के. डी. सोनवणे, सोमनाथ सोमाणी व शिवाजी कोंडे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.
आमदार थोपटे म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात १ लाख ९६ हजार २२५ टन उसाचे गाळप केले आहे. आणि १३ एप्रिलपूर्वी एफआरपीप्रमाणे संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केलेली आहे. कारखाना १२५० टनाचा व जुन्या मशिनरीचा असून, लवकरच ३५०० टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे. त्याकरिता ३५ कोटींचे भाग भांडवल जमा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. कारखान्याने नियोजित ९० केएलपीडी क्षमतेची डिस्टीलरीसंदर्भात सर्व शासकीय मान्यता मिळविल्या आहेत. तसेच, अन्न व नागरी पुरवठा विभाग दिल्ली यांच्याकडून अल्प व्याजदरात कर्ज उभारणीस मान्यता मिळवली आहे. १८ मेगावॉट को-जन प्रकल्प उभारणीसंदर्भात इन्फास्ट्रक्चर ग्रीड कनेक्टिव्हिटी स्वीच यार्डचीही मंजुरी मिळाली आहे. कमी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा असल्याने व बॉयलर व मिल व इतर विभागाच्या मशिनरी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने बँक कर्ज नाही. यामुळे यावर्षी ५३ हजार ४० टन उसाचे गाळप केलेले आहे आणि त्या उसाचे ५० टक्के ऊस बिल कारखान्याने शेतकऱ्यांना अदा केलेले आहे. उर्वरित ऊस बिल देखील एफआरपीप्रमाणे लवकरच अदा करण्यात येणार आहे.’’

कारखाना बंद करण्याचा निर्णय हा कामगार संघटनेच्या प्रतिनिधींशी चर्चा करून घेण्यात आला आहे. पुढील हंगामात पूर्ण क्षमतेने कारखाना सुरु झाल्यावर तात्पुरती स्थगित केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर घेतले जाणार आहे.
- संग्राम थोपटे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com