
भोरमध्ये बाळासाहेब ठाकरे दवाखाना सुरू
भोर, ता. ४ : शहरातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक २ मध्ये राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत ''हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना'' सुरू करण्यात आला. महाराष्ट्र दिनानिमित्त आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष समीर सागळे, गटनेते सचिन हर्णसकर, रोहण बाठे, डॉ. प्रियांका तारू, डॉ. अक्षय वाघमारे, नगरसेवक गणेश पवार, नगरसेविका तृप्ती किरवे, वृषाली घोरपडे, राजकुमार शिंदे, चिकू सागळे, जगदीश किरवे, सुमंत शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. दवाखान्यामध्ये दररोज दुपारी २ ते रात्री १० या वेळेमध्ये मोफत उपचार केले जाणार असून त्यासाठी पाच कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
आमदार संग्राम थोपटे यांनी आपला रक्तदाब आणि मधूमेहाची तपासणी करून आरोग्यसेवेचा प्रारंभ केला. यावेळी दवाखान्यामधील आरोग्य सेवांची माहिती देण्यात आली. दवाखान्यामधील मोफत तपासणी, मोफत उपचार आणि मोफत औषधे देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांनी विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.
शहरात नगरपालिकेकडे दवाखान्याची एकही वेगळी इमारत नाही. सध्या नगरपालिकेच्या शाळेमधील खोल्यांमध्ये हा दवाखाना सुरु करण्यात आला आहे. मात्र नगरपालिकेच्या दवाखान्याच्या वेगळ्या इमारतीच्या निधीसाठी प्रयत्न करणार आहे.
-संग्राम थोपटे, आमदार
01659