
भोर शहराला समस्यांचा विळखा
भोर, ता. १६ ः शहरातील नागरिकांना शेकडो समस्यांना सामोरे जावे लागत असूनही नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल होत नाही. त्यामुळे भोरवासीयांना अडचणी नाहीत, असा गोड गैरसमज नगरपालिका प्रशासनाला झाला असून नागरिक मात्र फक्त सोशल मिडीयावरच तक्रारींच्या चर्चा करीत आहेत. यामुळे केवळ भोरवासीयांचाच नव्हे तर शहरात शासकीय किंवा इतर कामासाठी आणि बाजारासाठी येणा-यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे.
शहरातील रस्त्यांवरील आणि शासकीय जागांवरील अतिक्रमणे, विनापरवाना व नियमानुसार न होणारी बांधकामे, अयोग्य पद्धतीने होत असलेली विकासकामे, वाहतूक व्यवस्था, रहदारी, विजेचा खेळखंडोबा, पाण्याच्या वितरण लाईनमधील अडथळे आदी प्रमुख समस्या व अडचणी भोरवासीयांच्यापुढे नेहमीच आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून समस्यांचा डोंगर उभा आहे. नगरपालिका प्रशासन सोईस्कर पद्धतीने समस्यांकडे काणाडोळा करीत आहेत. आणि नगरपालिकेचे पदाधिकारी हे प्रशासकीय बाब असल्याचे सांगत हात वर करतात. उलट नगरपालिकेचे पदाधिकारी हे समस्या व अडचणीमध्ये वाढ होण्यास खतपाणी घालत आहेत. यामुळे भोरवासीयांच्या समस्या सोडविणार कोण? असा प्रश्न उभा राहिला आहे. शहरातील सुमारे २२ हजार लोकसंख्येपैकी केवळ बोटावर मोजण्याइतके तीन-चार लोकच तक्रारी करीत आहेत. मात्र, त्यांना इतरांची साथ मिळत नाही त्यामुळे तेही खचून जात आहेत. नगरपालिकेत एकही विरोधी पक्ष नाही. सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे कॉंग्रेस पक्षाचे आहेत. त्यामुळे सर्व निर्णय हे कोणत्याही बैठकीत लगेच मंजूर होतात.
शहरात सर्वाधिक समस्या ही वाहतूक कोंडीची आहे. वाहनचालकांवर कोणाचाही दबाव नाही. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहने कोठेही आणि कशीही पार्क केलेली असतात. काही वेळा रुग्णवाहिकेलाही जाण्यासाठी रस्ता मिळत नाही. रस्त्यांवर व्यापारी व व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालक, कामाची टाळाटाळ करणारे नगरपालिका प्रशासन, दुर्लक्ष करणारे नगरपालिकेचे पदाधिकारी आणि शांत नागरिक यामुळे शहरातील अतिक्रमण आणि वाहतुकीची समस्या अतिशय वेगात वाढत आहे. यामुळे नगरपालिकेत आणि भोर शहरात सर्व काही अलबेल असल्याची चर्चा सुरु आहे.
शहरातील नागरिकांनी वाहतूक, अतिक्रमण व बांधकामाविषयीच्या तक्रारी वैयक्तिक द्याव्यात, त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, यापुढे एकही अतिक्रमण होऊ देणार नाही आणि पूर्वी झालेली अतिक्रमणे टप्याटप्याने काढण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
-हेमंत किरुळकर, मुख्याधिकारी, भोर नगरपालिका