
भोरमध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाचा कहर
भोर, ता. ३० : शहरासह तालुक्याला मंगळवारी (ता.३०) सायंकाळी वादळी पावसाने झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी पाऊस झाला. यामुळे दुसऱ्या दिवशी नागरिकांनी पावसाचा कहर अनुभवला. वादळी पावसामुळे तालुक्यात विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली. घरांचे छप्पर उडून गेले आणि मंगळवारच्या आठवडे बाजारातील खरेदी-विक्रेत्यांची धांदल उडाली.
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील वारवंड ते कोंढरी टप्यात झाडे कोसळून वाहतूक ठप्प झाली. भोर-शिरवळ मार्गावरील वडगाव डाळाचे गावाजवळ मोटारीवर झाड पडल्याने गाडीचे फार नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु गाडीमधील प्रवासी जखमी झाले. भोर-आंबवडे मार्गावर आंबेघर येथे झाड रस्त्यावर पडून वाहतूक ठप्प झाली होती. भोर-कापूरहोळ मार्गावर भोलावडे गावाजवळ झाड पडल्यामुळे विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे भोर शहराचा वीजपुरवठा खंडित झाला.
शहरातील सुभाष चौक ते एसटी स्टँड रोडवर घरांचे छप्पर उडून दुकाने व घरांचे नुकसान झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित जेसीबीच्या साहाय्याने वडगाव, भोलावडे व आंबेघर येथील झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. वारवंड येथील रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्यासाठी जेसीबी पाठविण्यात आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता संजय वागज यांनी सांगितले.
महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची तत्परता
महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विजेच्या तारा जोडण्याच्या कामास तत्परता दाखविल्यामुळे बहुतांश ठिकाणी रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. विजेच्या तारा जोडण्याच्या कामास काही ठिकाणी सुमारे तीन-चार तासांचा कालावधी लागल्याचे महावितरणचे उपअभियंता संतोष चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, तालुका प्रशासनाकडून वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे तहसीलदार सचिन पाटील यांनी सांगितले.
01752