
भोरमध्ये शिक्षकांच्या तब्बल २७१ जागा रिक्त
भोर, ता. ७ ः तालुक्यातील २७४ प्राथमिक शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या मंजूर असलेल्या ७८९ पदांपैकी तब्बल २७१ जागा (म्हणजे शिक्षकांच्या ३४ टक्के जागा) रिक्त झाल्या आहेत. तालुक्यातील ४३ शाळांमध्ये शिक्षकांची संख्या शून्य आहे. त्यामुळे १५ जूनपासून शैक्षणीक वर्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होणार आहेत. विशेषतः तालुक्याच्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील शाळांच्या गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.
मागील आठवड्यात शिक्षकांच्या बदल्या करताना समानीकरणाचा नियम न राबविल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त झाल्या आहेत. शाळांना सुट्टी लागण्यापूर्वी तालुक्यात १९४ शिक्षक रिक्त होते. मात्र, १४६ ऑनलाइन बदल्या झाल्यानंतर ६१ शिक्षक हे इतर तालुक्यात गेले. इतर तालुक्यातून फक्त २६ शिक्षक भोरमध्ये आले. इतर तालुक्यातून येणारे ४२ जण अद्याप हजर झाले नाहीत. त्यामुळे रिक्त शिक्षकांची संख्या वाढून २७१ झाली. नवीन नियमाप्रमाणे तालुक्यातील ३६ शाळा दुर्गम श्रेणीत मोडल्या जात आहेत. त्यामुळे सद्यःस्थितीत तालुक्यातील २७४ शाळांमधील नऊ हजार ७११ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याबाबत कार्यवाही करावी लागणार आहे.
लवकरच शिक्षक हजर होतील
तालुक्यात शून्य शिक्षक असलेल्या ४३ शाळांपैकी ३२ शाळांमध्ये शेजारच्या शाळेतील शिक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला असून उर्वरित ११ शाळांमधील बदली झालेल्या शिक्षकांना अद्याप सोडलेले नाही. त्यामुळे जून महिन्यात शाळा सुरू होण्यास सध्यातरी अडचण येणार नाही. याशिवाय पुढील काही दिवसांत इतर तालुक्यातून बदली झालेले काही शिक्षक भोरमध्ये हजर होण्याची शक्यता आहे, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.