
‘दादा, प्रांत करताहेत पाच लाखांची मागणी’
बारामती, ता. ७ : स्वतःच्या गावातच दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच एका ग्रामस्थाने थेट उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यावर कामासाठी पैसे मागितल्याचा आरोप केला आणि काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
काटेवाडी (ता. बारामती) येथे ‘एक तास राष्ट्रवादी पक्षासाठी’ या उपक्रमाअंतर्गत अजित पवार यांनीच शनिवारी (ता. ७) वेळ देत लोकांचे म्हणणे ऐकून घेतले. लोकांशी चर्चा करत असतानाच एका शेतकऱ्याने उभे राहत, ‘भूसंपादनाच्या कामामध्ये पोटहिस्से करून दिले नाहीत, मुद्दाम अडथळे आणले, पाच लाखांची मागणी केलीस’ असा जाहीर आरोपच केला. थेटपणे झालेल्या या आरोपानंतर काही काळ वातावरणातही तणाव निर्माण झाला.
त्यावर दादासाहेब कांबळे यांनीही तातडीने, ‘भूसंपादन प्रक्रीयाच झालेली नाही, त्यामुळे हा आरोपच चुकीचा आहे,’ असे अजित पवार यांना सांगितले. अत्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित शेतकरी अजित देवकाते यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘आपल्या दोघांचं नाव एकच आहे, मी इतक्या संयमाने बोलतो आहे, तुम्ही पण शांततेने घ्या, जे काही काम असेल ते मार्गी लावून देतो,’ असे सांगत या विषयावर पडदा पाडला.
ग्रामस्थांमध्ये खमंग चर्चा
या प्रकाराची कार्यक्रमानंतर मात्र खमंग चर्चा झाली. अनेकांकडून अनेक सुरस कहाण्या सांगितल्या गेल्या. दादांनी कडक भूमिका घ्यायलाच हवी, अशीही मागणी काही ग्रामस्थांनी केली. प्रशासकीय भवन येथे अनेक कार्यालयात दलालांचा वावर आणि होणारी अडवणूक याबाबतही आता अजित पवार यांच्याकडेच तक्रारी करणार असल्याचे ग्रामस्थांनी बोलून दाखविले.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10454 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..