
‘आडवा येत असेल तर अजित पवारलाही उचला’
बारामती - आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा आपल्या सडेतोड स्वभावाचे दर्शन घडविले. ‘तडजोड होतीय का ते पाहा, नाही तर मग जो आडवा येईल, त्याला सरळ उचला, मग तो अजित पवार का असेना,’ असे आदेश त्यांनी डीवायएसपी गणेश इंगळे (Dysp Ganesh Ingale) यांना दिला.
बारामतीत अनेक नागरिक त्यांना विविध कामे घेऊन भेटत असतात. एकाने जागेची मोजणी सुरु असलेली बाब निदर्शनास आणून देत तक्रार केली. दोन गटात वाद आहेत, त्यामुळे समोरचा ऐकतच नाही, असे त्याने पवार यांना सांगितले. त्यावर अजित पवार यांनी थेट डीवायएसपी गणेश इंगळे यांना बैठक घेत वरील आदेश दिला.
काटेवाडीमध्ये अजित पवार यांनी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या उपक्रमाखाली वेळ दिला. अनेकांनी या वेळी विविध तक्रारी त्यांच्यापुढे मांडल्या. पालखी मार्गाबाबत चर्चा सुरु असतानाच एकाने तर थेट एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेऊनच दोन टक्के कमिशन घेत असल्याचे सांगितल्यानंतर अजित पवारही अवाक झाले.
जाहीरपणे अजित पवार याबाबत काही बोलले नसले; तरी त्यांच्यापर्यंत जायचा तो संदेश गेलेला असून, ते याबाबत योग्य ती कार्यवाही करतील, अशी चर्चा काटेवाडीच्या ग्रामस्थांमध्ये होती. अनेकांची कामे अजित पवार यांनी मार्गी लावून दिली.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10458 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..