
बारामतीत नगरपालिका निवडणुकीचे वारे
बारामती, ता. १० : नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यामुळे आता इच्छुकांची गडबड अधिकच वाढली आहे. बारामतीत आता निवडणूक फीव्हर चांगलाच जाणवू लागला आहे.
बारामती नगरपालिकेने प्रभागनिहाय सूचना व हरकती मागविल्या आहेत. त्यावर २३ मे रोजी जिल्हाधिकारी अंतिम सुनावणी घेऊन त्याचा अभिप्राय निवडणूक आयोगाकडे ३० मेपर्यंत पाठविणार असून, राज्य निवडणूक आयुक्त ६ जून रोजी अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देणार आहेत. बारामती नगरपालिकेच्या प्रभागांच्या आरक्षणाची घोषणा ७ जून रोजी होणार आहे. अनेकांच्या नशिबाची परीक्षा त्यादिवशी असेल. कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार, याचा अंदाज काहींनी बांधला असला, तरी प्रत्यक्षात जर आरक्षण बदलले; तर मात्र इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी पडणार आहे.
आता ४१ नगरसेवक
नगरपालिकेच्या हद्दवाढीनंतर आता नगरसेवकांची संख्या ४१ होणार असून, प्रभागांची संख्या देखील २० पर्यंत जाणार आहे. पूर्वी बारामती नगरपालिकेमध्ये ३९ नगरसेवक कार्यरत होते, आता ही संख्या दोनने वाढून ४१ नगरसेवक नगरपालिकेत दिसतील. पूर्वी जनतेमधून नगराध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. आता मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने त्यात बदल करून नगरसेवक हे नगराध्यक्षाची निवड करतील. हा एक महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे. साधारण एक लाख पाच हजार लोकसंख्या गृहीत धरून बारामती नगरपालिकेची निवडणूक होणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम ४५ दिवसांचाच
आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर लगेचच निवडणुकीची अधिसूचना निघू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि नियमानुसार ४५ दिवसांत हा कार्यक्रम पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नगरसेवकांना प्रचाराला देखील नेमका किती कालावधी मिळेल, याबाबतही साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इच्छुकांनी आतापासूनच भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
मिलिंद संगई, बारामती.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10468 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..