
वादळ व पावसाने बारामतीला झोडपले
बारामती, ता. ११ : ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने बुधवारी (ता. ११) संध्याकाळी बारामती शहराला अक्षरशः झोडपून काढले.
बारामती शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आभाळ भरून येत होते, मात्र पावसाने हुलकावणी दिली. बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसापेक्षाही वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या पडल्या. अनेक ठिकाणी वाऱ्याचा वेग एवढा प्रचंड होता की काचा हलत होत्या. या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे समोरचे काही दिसत नव्हते.
विजांचा लखलखाट सुरू होताच काही क्षणातच शहरातील वीज पुरवठा खंडित झाला. पावसापेक्षाही वाऱ्याचा वेग प्रचंड होता. वादळाने बारामती शहराला झोडपून काढले, अशीच परिस्थिती होती. या वादळाच्या तडाख्यामध्ये लोक स्थिर उभे राहू शकत नव्हते. पावसाची तीव्रता अधिक होती. काही क्षणातच बारामती शहरातील रस्त्यांना या पावसाच्या पाण्याने नदीचे स्वरूप प्राप्त झाले. सखल भागात पाणी साचले होते.
वाऱ्याच्या प्रचंड वेगाने भीतीमुळे अनेकांनी आपल्या दुकानांची शटर लावून घेतली. वादळाचा वेग एवढा प्रचंड होता की काही कळेपर्यंतच अनेकांच्या दुकानांमध्ये धूळ व बाहेरील कचरा दुकानात शिरला होता.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10473 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..