अवघ्या दहा मिनिटांत बारामतीची दैना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवघ्या दहा मिनिटांत बारामतीची दैना
अवघ्या दहा मिनिटांत बारामतीची दैना

अवघ्या दहा मिनिटांत बारामतीची दैना

sakal_logo
By

बारामती, ता. १२ : बारामती शहरात बुधवारी (ता. ११) सायंकाळी झालेल्या वादळाने असंख्य झाडांचे मोठे नुकसान झाले. शहरातील विविध ठिकाणी घरांवरील पत्रे उडणे, पाण्याच्या टाक्यांची झाकणे उडणे, पाण्याच्या टाक्या उडून लांब जाऊन पडणे, सोलर सिस्टिमचे नुकसान, काच फुटणे, वाहनांवर झाडांच्या फांद्या पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बारामती शहरात बुधवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास अवघ्या दहा मिनिटाच्या वादळाने शहराची अक्षरशः वाताहत झाली. बारामती शहर हे झाडांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, शहराच्या विविध ठिकाणी असलेली असंख्य झाडे वादळाच्या तडाख्याने उन्मळून पडली. अनेक झाडांच्या फांद्या मोडून पडल्या. भिगवण रस्त्याच्या बाजूला सिमेंट कॉंक्रिटचे फुटपाथ केले होते, या वादळाच्या तीव्रतेने ते उघडून झाडे उन्मळून पडली.

नागरिकांचे नशीब बलवत्तर
या वादळादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. या झाडांखाली जर कोणी असते, तर जीवितहानी होण्याची भीती होती. सुदैवाने अशी काही घटना घडली नाही. मात्र, या वादळाच्या तडाख्याने पुन्हा एकदा शहरातील झाडांची पाहणी करण्याची वेळ आलेली आहे. कमकुवत झालेली, कुजलेली झाडे काढून टाकण्याची नितांत गरज आहे.

पानगळतीमुळे रस्त्यावर कचरा
या वादळाने शहरात रस्त्यावर जागोजागी पानगळती झाल्यामुळे पानांचा कचरा साठून राहिला आहे. नगरपालिका प्रशासनाने रात्री युद्धस्तरावर प्रयत्न करून रस्त्यात पडलेली झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. उन्मळून पडलेल्या झाडांची तोडणी करून लाकडे भरून नेण्यात आली, मात्र अजूनही बऱ्याच ठिकाणी झाडे दोन रस्त्यांच्या मधल्या जागेत पडून आहेत.

आपत्ती निवारण कक्ष गरजेचा
यापुढील काळात अशाप्रकारे आपत्ती आल्यास बारामती शहरात आपत्ती निवारण कक्ष उघडणे व याबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्याची देखील आवश्यकता या निमित्ताने पुढे येत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या वादळाने जर इतक्या मोठ्या प्रमाणात हानी होत असेल, तर मोठे वादळ आल्यास शहरातील यंत्रणा कुचकामी ठरेल की काय, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.

‘झाडाखाली आसरा घेऊ नये’
या पुढील पावसाळ्याच्या काळात नागरिकांनी पाऊस पडत असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे. झाडावर वीज पडण्याची आणि झाड पावसाच्या व वाऱ्याच्या वेगाने कोसळण्याची भीती असते. त्यामुळे झाडाखाली उभे राहण्याचे पावसाळ्यात टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10475 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top