
कॅन्सर रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी
बारामती, ता. १३ : येथील नियोजित कॅन्सर रुग्णालयाच्या जागेबाबत शुक्रवारी (ता. १३) मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात या रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न आता मार्गी लागला.
बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशेजारी असलेल्या राज्य परिवहन मंडळाच्या कार्यशाळेची जागा नियोजित कॅन्सर रुग्णालयासाठी संपादित करण्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मानस आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्य परिवहन मंडळ, एमआयडीसी, वैद्यकीय शिक्षण व अर्थ विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नगर, सातारा, सोलापूर, पुणे व कोल्हापूर जिल्ह्याच्या दृष्टीने बारामती मध्यवर्ती असून, येथील कॅन्सर रुग्णालय या सर्व जिल्ह्यांसाठी मध्यवर्ती असेल, असे अजित पवार यांनी या बैठकीत नमूद केले.
एसटी कार्यशाळेसाठी एमआयडीसीमध्ये तितकीच जागा उपलब्ध करून देण्यात येणार असून, वैद्यकीय महाविद्यालयाशेजारील सध्याची कार्यशाळेची जागा कॅन्सर रुग्णालयासाठी हस्तांतरित करण्याबाबतही चर्चा झाली. अजित पवार यांनी सर्व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आता या रुग्णालयासाठी जागा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या शिवाय एमआयडीसीमध्ये क्रीडा संकुल करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली.
जागा उपलब्ध झाल्यानंतर रुग्णालय उभारणीसाठी प्रकल्प अहवाल तयार होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या रुग्णालय उभारणीसाठी टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या व्यवस्थापनासोबत अगोदरच चर्चा सुरु केली असून, येत्या काही दिवसात याचा नेमका आराखडा तयार होणार आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10487 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..