बारामती पालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार ः अजित पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती पालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार ः अजित पवार
बारामती पालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार ः अजित पवार

बारामती पालिकेची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढणार ः अजित पवार

sakal_logo
By

बारामती, ता. ९ ः येथील नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढवेल, अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली. माळेगाव नगरपंचायत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावर लढविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आगामी बारामती नगरपालिका, माळेगाव नगरपंचायत तसेच खरेदी विक्री संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर, सचिन सातव, किरण गुजर, बाळासाहेब तावरे, संदीप जगताप यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, नगरपालिकेला संधी देताना काही नवीन चेहरे तर काही जुने अनुभवी चेहरे अशा पद्धतीने मिलाफ करून नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. कोणी काहीही आश्वासन दिली तरी त्यांच्याकडे न जाता पक्षाकडे रीतसर उमेदवारीसाठी अर्ज करा, पक्ष सर्व अर्जांचा विचार करून याबाबत अंतिम निर्णय घेईल.

नगरपालिकेसाठी प्रचार करताना कार्यकर्त्यांनी पातळी सोडून प्रचार करू नये, वैयक्तिक स्वरूपाची टीका करू नये, सर्वांना विश्वासात घेऊन ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे, बारामतीकरांनीही गेल्या पाच वर्षात झालेला विकास जवळून पाहिलेला आहे, त्यामुळे नगर परिषदेची ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावरच लढणार आहोत.

या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असेल याची खात्री आहे मात्र सर्वांनाच संधी देणे शक्य होणार नाही. तरीही इतर ठिकाणी तसेच स्वीकृत नगरसेवक पदी इच्छुकांना संधी देण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही देखील अजित पवार यांनी दिली.

निवडणूक सुरू झाल्यानंतर अनेक जण काही ठिकाणी बसून लूज स्टेटमेंट करतात, अशा पद्धतीचे उद्योग कुणीही करू नयेत, बारामतीत घडणाऱ्या गोष्टी माझ्यापर्यंत येत असतात, त्याच्यामुळे सर्वांनीच याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

एका ठिकाणीही पराभव नको...

बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जागा निवडून आल्या पाहिजेत, एकाही जागेवर पराभव होता कामा नये, अशी सूचना पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Bmt22b10688 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..