सततच्या पावसाने बारामतीकर त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सततच्या पावसाने बारामतीकर त्रस्त
सततच्या पावसाने बारामतीकर त्रस्त

सततच्या पावसाने बारामतीकर त्रस्त

sakal_logo
By

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेवरही परिणाम; जनजीवन विस्कळित

बारामती, ता. १२ ः शहरात सकाळपासूनच सुरू झालेल्या संततधार पावसाने जनजीवन पार विस्कळित झाले. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दररोज पडणारा पाऊस आता लोकांसाठी डोकेदुखी ठरत असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी या पावसाने घराबाहेर पडणे लोकांना अवघड झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून बारामती शहर व तालुक्यामध्ये पावसाची दैनंदिन हजेरी असते. त्यामुळे पाऊस आता कधी संपणार, याची सर्वांना प्रतीक्षा आहे. दसऱ्यानंतर बारामतीचा पाऊस संपतो, यंदा मात्र दसरा उलटून आठवडा होऊन गेला तरी पाऊस थांबायचे नाव घेत नसल्यामुळे सर्वजण त्रस्त आहेत.

दिवाळी तोंडावर आलेली असल्याने फराळाचे साहित्य करण्यासह अन्य तयारी करण्याच्या दृष्टीने लोकांना खरेदीसाठी बाहेर पडायचे आहे, मात्र पावसाने सर्वत्र चिखल व पाणी साचत असल्याने लोक घराबाहेर पडायचे टाळत आहेत. पाऊस उघडल्यानंतर खरेदी करू, अशी लोकांची भूमिका आहे.

इकडे दोन वर्षाच्या कोविडच्या संकटानंतर यंदा दिवाळीचा सण चांगला साजरा होईल, या अपेक्षेने बारामती शहरातील सर्वच व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली आहे. पावसाचा व्यापारपेठेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे.

बारामती तालुक्यातील अतिवृष्टी होत असल्याने यंदा हवामान बदलाचे परिणाम जाणवत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मंगळवारी (ता. ११) बारामती तालुक्यामध्ये अनेक गावांत पावसाने जोरदार हजेरी लावली. यात सुपे ११०, वडगाव निंबाळकर ११८, मुर्टी १२७ मिलिमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली. जिरायत पट्ट्यात पडलेला हा पाऊस आश्चर्यकारक मानला जात आहे. बारामती तालुक्यातील बव्हतांश गावांनी पावसाची सरासरी ओलांडली असून, काही ठिकाणी सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्यामुळे आता पाऊस थांबला पाहिजे, अन्यथा पिकांची नासाडी होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.

मंगळवारी (ता. १२) झालेला पाऊस व कंसात आजपर्यंतचा एकूण पाऊस, मि.मी.मध्ये
बारामती- १८ (७२१), उंडवडी कडेपठार- २० (५००), सुपा- ११० (५४२), लोणीभापकर ७९ (६१६), माळेगाव कॉलनी १५ (४४८), वडगाव निंबाळकर ११८ (९०३), पणदरे १८ (४०३), मोरगाव ६७ (७१५), लाटे २० (४८१), ब-हाणपूर २१ (५५०), सोमेश्वर कारखाना ४० (६६९), जळगाव कडेपठार- २५ (६१५), आठ फाटा होळ ५० (६२२), मानाजीनगर २० (४४७), चांदगुडेवाडी ५१ (६९९), काटेवाडी ८ (४०४), अंजनगाव १३ (४९१), जळगाव सुपे २५ (४८९), सोनगाव २ (७१५), कटफळ ४५ (५५५), सायंबाचीवाडी ५४ (४३३), मुर्टी १२७ (७९२), मोढवे ९४ (७७५).