बारामतीकरांनी अनुभवला इतिहास ‘याची देही याची डोळा...’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीकरांनी अनुभवला इतिहास ‘याची देही याची डोळा...’
बारामतीकरांनी अनुभवला इतिहास ‘याची देही याची डोळा...’

बारामतीकरांनी अनुभवला इतिहास ‘याची देही याची डोळा...’

sakal_logo
By

शारदोत्सव ः पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने उपक्रमाचे आयोजन


बारामती, ता. २३ ः अगदी रामायणापासून ते देश स्वतंत्र होईपर्यंत आणि त्यानंतरही अगदी कारगिल युद्धापर्यंतचा सर्व इतिहास बारामतीकरांनी अडीच तासांत ‘याची देही याची डोळा’ अनुभवला..... औचित्य होते पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने आयोजित शारदोत्सव २०२२ मध्ये अशोक हांडे व त्यांच्या १५० सहकलाकारांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचे.


शनिवारी (ता. २२) बारामतीच्या गदिमा सभागृहात ‘आजादी ७५’ हा सुंदर कार्यक्रम ध्वनीचित्रफितीसह, गाणी, नृत्य व प्रहसनातून अशोक हांडे यांनी सादर केला. बारामतीकरांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

दरवर्षी दिवाळीनिमित्त पवार सार्वजनिक न्यासाच्या वतीने शारदोत्सवाचे दोन दिवस आयोजन केले जाते. यंदा अशोक हांडे यांच्या कार्यक्रमाने शारदोत्सवाचा प्रारंभ झाला.

रामायणापासून या इतिहासाचा प्रारंभ झाला, गौतम बुध्दांचे तत्वज्ञान, सिकंदर, अल्लाउद्दीन खिलजी, मेवाडवरचे आक्रमण, त्यानंतर अकबर बादशहाचा उदय, मुगल साम्राज्याचा उदय, जहांगिरची कारकीर्द, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उदय, हिंदवी स्वराज्याची स्थापना, त्यानंतर संभाजी महाराज, राजाराम महाराज यांच्यानंतर पेशवाईचा उदय, त्यानंतर आलेले इंग्रजांचे राज्य, झाशीची राणी लक्ष्मीबाई, १८५७ चे बंड, मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान, लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान, त्यानंतर भारत व पाकिस्तानची झालेली फाळणी, अगदी कारगिलपर्यंतचा प्रवास गीते, नृत्य, प्रहसन व दृकश्राव्य माध्यमातून बारामतीकरांपर्यंत उभा राहिला.

खासदार सुप्रिया सुळे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ॲड. ए. व्ही. प्रभुणे, विश्वस्त किरण गुजर व अश्विनी पवार कार्तिकीयेन यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

जुन्नर परिसरातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या अशोक हांडे यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कार्यक्रमानंतर प्रशंसा केली. त्यांनी उभा केलेला हा इतिहास बारामतीकर कायम स्मरणात ठेवतील, असे ते म्हणाले.

सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, प्रतिभाताई पवार यांच्यासह पवार कुटुंबीय व बारामतीकर मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
------------