बारामती-फलटण रेल्वेच्या भूसंपादनाला वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती-फलटण रेल्वेच्या भूसंपादनाला वेग
बारामती-फलटण रेल्वेच्या भूसंपादनाला वेग

बारामती-फलटण रेल्वेच्या भूसंपादनाला वेग

sakal_logo
By

बारामती, ता. ३१ : गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या बारामती-फलटण या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचे काम पुन्हा एकदा वेगाने सुरु होणार आहे. या रेल्वेमार्गासाठी १८६ हेक्टर जमीन संपादित करायची असून, त्यापैकी आजमितीस १०९ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून, उर्वरित भूसंपादनही वेगाने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
रेल्वेच्या दृष्टीने बारामती-फलटण-लोणंद हा मार्ग महत्त्वाचा असून, दक्षिण भारताला जोडताना अंतर कमी करणारा आहे. त्यामुळे हा मार्ग प्रत्यक्षात होणे रेल्वेसाठीही गरजेचे आहे. रेल्वेने भूसंपादनासाठी आवश्यक निधीही महसूल विभागाला उपलब्ध करून दिलेला आहे. या रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी गेल्या काही महिन्यात जोर लावला होता.
त्यामध्ये प्रामुख्याने बारामती तालुक्यातील तेरा गावांचा समावेश आहे. यात शासकीय व खासगी, अशा दोन जमिनींचा समावेश आहे. एकूण संपादनापैकी साठ टक्क्यांहून अधिक भूसंपादन झालेले असल्याने आता उर्वरित भूसंपादनासाठी महसूल विभाग प्रयत्न करणार आहे. या भूसंपादनासाठी बारामती व फलटण तालुक्यांसाठी एकूण २३९ कोटी रुपयांची गरज भासणार असल्याचा प्राथमिक अंदाज असला, तरी या भूसंपादनासाठी उशीर होत असल्याने हा खर्च वाढण्याचीही भीती व्यक्त होत आहे. एकूण भूसंपादन प्रक्रीयेपैकी १६३ गटांचे भूसंपादन पूर्ण झालेले असून, अद्यापही १३३ गटांचे भूसंपादन करणे बाकी आहे.

भूसंपादन करायचे क्षेत्र (हेक्टर)- १८६
भूसंपादन केलेले क्षेत्र (हेक्टर)- १०९
भूसंपादन पूर्ण झालेली गट संख्या- १६३
भूसंपादन बाकी असलेली गट संख्या- १३३
भूसंपादनासाठी लागणारी रक्कम (रुपये)- २३९ कोटी

बारामती तालुक्यातील भूसंपादन झालेले गावनिहाय क्षेत्र
लाटे- १४.३६ हेक्टर, माळवाडी- १६.६५ हेक्टर, कुरणेवाडी- १२.६४ हेक्टर, बऱ्हाणपूर- ६.६ हेक्टर, नेपतवळण- १५.३९ हेक्टर, ढाकाळे- ४.६२ हेक्टर, थोपटेवाडी- ७.८१ हेक्टर, कऱ्हावागज- ११.५९ हेक्टर, सावंतवाडी- ११.६१ हेक्टर, तांदूळवाडी- ८.७० हेक्टर. (एकूण १०९ हेक्टर) खामगळवाडी, कटफळ, सोनकसवाडी येथे अद्याप भूसंपादन झालेले नाही.