अजितदादा रुग्णालयात, डॉक्टर घरी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अजितदादा रुग्णालयात, डॉक्टर घरी!
अजितदादा रुग्णालयात, डॉक्टर घरी!

अजितदादा रुग्णालयात, डॉक्टर घरी!

sakal_logo
By

बारामती, ता. १९ : वेळ दुपारी दोनची...स्थळ बारामतीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय...अचानकच विरोधी पक्षनेते अजित पवार यांची एन्ट्री होते. रुग्णालयात सामसूम...काही कर्मचाऱ्यांची पळापळ होते...महाविद्यालयाचे अधिष्ठाता हजर नाहीत म्हटल्यावर स्वतःच्या मोबाईलवरूनच त्यांना फोन लावला...त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर, ‘आज सुटी आहे का?’ असा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर ‘आज सुटी नाही,’ असा खुलासा अधिष्ठात्यांनी केला.
येथील डॉक्टर दर शनिवारी सुटी घेतात, अशा तक्रारी अजित पवार यांच्याकडे गेल्या होत्या, त्याची खातरजमा करण्यासाठी अजित पवार यांनी कोणालाही कसली कल्पना न देता थेट रुग्णालय गाठल्यानंतर त्यांनाही कमालीचा धक्काच बसला. सुटी नसताना एकही डॉक्टर कामावर हजर नाही, हे पाहून ते कमालीचे नाराज झाले. ‘कोट्यवधींचा खर्च करून इतक्या प्रशस्त इमारती उभ्या करूनही रुग्णांना सेवाच मिळत नसेल तर अर्थ नाही,’ अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘डॉक्टरच जागेवर नसतील; तर रुग्णांवर औषधोपचार करणार कोण?’ असा प्रश्न उपस्थित करत हा विषय त्यांनी गांभीर्याने घेतला. ‘आगामी काळात मी स्वतः येऊन या सगळ्या बाबींचा आढावा घेणार, प्रसंगी काही जणांना निलंबित करण्याची शिफारस करावी लागली तरी चालेल पण शिस्त लागायला हवी,’ असा निर्धारच त्यांनी या वेळी व्यक्त केला. तसेच, अनुपस्थितीबाबतही सविस्तर माहिती घेण्याची सूचना त्यांनी त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील यांना केली.
रुग्णालयाची स्वच्छता व इतर बाबींबद्दलही नाराजी व्यक्त करतानाच ऑपरेशन थिएटर, आयपीडी, आयसीयू युनिट, सीएसएसडी स्टरलायझेशन, वॉर्ड सुरु करणे या बाबी का प्रलंबित आहेत, याचा जाबही अजित पवार यांनी अधिष्ठात्यांना विचारला. महाविद्यालयाचे अधीक्षक नंदकुमार कोकरे यांनी त्यांना माहिती दिली. बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यावेळी उपस्थित होते.

डॉक्टरांवर वचकच नाही
लाखात पगार घेणाऱ्या या रुग्णालयाच्या डॉक्टरांवर कोणाचा वचक नाही, ही बाब या पूर्वीही अनेकदा पुढे आली होती. खुद्द अजित पवार यांनीही याचा अनुभव घेतल्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण विभाग याची कशी दखल घेतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.