
बारामतीच्या घरफोडीतील आरोपी काही तासांत जेरबंद
बारामती, ता. १ : सव्वा लाखांचे दागिने चोरणाऱ्या सराईत चोरट्यास शहर पोलिसांनी काही तासात कौशल्याने तपास करत गजाआड केले. याप्रकरणी सचिन राजू जवारे (वय ३६, रा. वडकेनगर, आमराई, बारामती) याला अटक करत पोलिसांनी २९ नोव्हेंबर रोजी झालेल्या चोरीचा काही तासात छडा लावला.
या चोरीतील संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करत तो फिर्यादीस परत दिल्याने या प्रकरणातील फिर्यादी नीता प्रफुल्ल चव्हाण यांनी पोलिसांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. जवारे याच्याविरोधात या पूर्वीचे सहा गुन्हे दाखल असून, आणखी कोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग होता, याचा तपास सुरु असल्याचे पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.
बारामती शहरातील शक्ती चेंबर्स येथील नीता प्रफुल्ल चव्हाण यांच्या घरातील रोकड व दागिने, असा जवळपास सव्वालाखांचा ऐवज चोरीला गेला होता. पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासत असताना जवारे याच्याकडे चौकशी सुरु झाली. कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोरीची कबुली देत ऐवजही काढून दिला. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.