बारामतीतील तोडफोड स्टंटबाजीसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीतील तोडफोड स्टंटबाजीसाठी
बारामतीतील तोडफोड स्टंटबाजीसाठी

बारामतीतील तोडफोड स्टंटबाजीसाठी

sakal_logo
By

बारामती, ता. १८ : महाविद्यालयीन युवकांनी शनिवारी संध्याकाळी शहरात मद्यपान करून अक्षरशः फिल्मी स्टाईलने धिंगाणा घातला. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात एक; तर बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन, असे तीन गुन्हे दाखल केले असून, जीवे मारण्याचा प्रयत्न व दरोडा, अशी कलमे या युवकांवर लावली आहेत. आठ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी एक जण अल्पवयीन आहे. या प्रकरणातील आठही जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. केवळ स्टंटबाजीच्या उद्देशाने त्यांनी ही तोडफोड केली, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली.
याप्रकरणी अनिश सुरेश जाधव, प्रथमेश विश्वनाथ मोरे, चिराग नरेश गुप्ता (वय २०, रा. प्रगतीनगर), पियुष मंगेश भोसले, विशाल अनिल माने, चेतन पोपट कांबळे (तिघेही रा. आमराई), शामुवेल सुरेश जाधव (रा. वसंतनगर) यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
एखाद्या चित्रपटात शोभावा, असा हा प्रकार शहरात हजारो लोकांच्या समक्ष घडला. संध्याकाळी तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत या आठ जणांच्या टोळक्याने ‘कोमल रेस्टॉरंट’मध्ये मद्यपान केल्यानंतर बिलाची मागणी केल्यावर बाटली फोडून व कोयता दाखवून तोडफोड केली. तसेच, गल्ल्यातील रोकड काढत एका ग्राहकाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर बाहेरील दुचाकी वाहनांची तोडफोड केली.
त्यांनतर एमआयडीसी रेल्वे गेटजवळील ‘शौर्य मोबाईल शॉपी’ येथे कोयत्याचा धाक दाखवून रोकड काढून घेतली. पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोल पंपावर दोन्ही दुचाकीत त्यांनी एक हजारांचे पेट्रोल भरले. पैसे मागितल्यावर कोयत्याने मारहाण केली. या वेळी पेट्रोल भरण्यास आलेले गणेश चांदगुडे यांच्या मनगटाला कोयता लागला. त्यानंतर टीसी कॉलेजसमोरील वाहनांची तोडफोड करत ‘पर्ण स्नॅक सेंटर’ येथे काउंटरच्या काचा बरण्यांची तोडफोड केली. तेथील अमरिश चौधरी याच्या मानेवर कोयत्याने वार केला, पण तो हाताने अडविल्याने त्याच्या तळहातावर जखम झाली. तेथील गल्ल्यातील पैसे काढून हे टोळके कॉलेज ग्राउंडच्या दिशेने पळून गेले. आठ आरोपींपैकी पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित तिघांच्या शोधासाठी पोलिस पथके तपास करीत आहेत. यातील अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिस या सर्वांकडे सखोल तपास करीत आहेत.

अनेकांच्या पालकांना आपल्या मुलांचे हे प्रताप पाहिल्यानंतर धक्काच बसला. विद्यार्थ्यांकडून कोयत्यासारख्या हत्यारांचा होणारा वापर चिंताजनक असून, सर्वच पालकांनी आपल्या मुलांकडे बारकाईने लक्ष द्यावे.
- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती