पालकांनो, मुलांकडे बारकाईने लक्ष द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकांनो, मुलांकडे 
बारकाईने लक्ष द्या
पालकांनो, मुलांकडे बारकाईने लक्ष द्या

पालकांनो, मुलांकडे बारकाईने लक्ष द्या

sakal_logo
By

बारामती, ता. १८ : बारामती शहरात शनिवारी (ता. १७) संध्याकाळी आठ महाविद्यालयीन युवकांनी अनेक ठिकाणी तोडफोड करत हातात कोयता घेत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यात दोन निरपराध नागरिक जखमी झाले. त्यामुळे बारामतीकरांत काहीसे भीतीचे वातावरण आहे. दुसरीकडे अल्पवयीन व महाविद्यालयीन मुलांचा गुन्ह्यांमधील सहभाग ही पोलिसांसाठी जशी डोकेदुखी आहे, तशीच पालकांची काळजी वाढविणारी घटना ठरली आहे.
बारामतीत या पूर्वीही एका खुनाच्या घटनेसह मोटारसायकल चोरीच्या आणि चोरीच्या व इतरही अनेक घटनांमध्ये अल्पवयीन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग होता. चित्रपटातील स्टंटबाजीसह रागावर नियंत्रण मिळविण्यात अपयश आल्याने तसेच किरकोळ कारणांवरून टोकाची भांडणे करण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल जाताना दिसत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यांकडे असलेला मोबाईल, पालकांचे कामाच्या व्यापामुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, बदललेली जीवनशैली व उंची राहणीमानाच्या मोहामुळे अनेकदा नकळतही मुले गुन्हे करतात. झटपट पैसे मिळविण्याच्या मोहापायी ही मुले गुन्ह्यांमध्ये अडकतात आणि त्यांच्या पुढील आयुष्याची राखरांगोळी होते. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष देण्याची गरज उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी बोलून दाखविली आहे.
आठ महाविद्यालयीन युवकांच्या पालकांना ही घटना समजल्यानंतर अनेकांना धक्काच बसला. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. खुनाच्या प्रयत्नासह दरोड्याचा गुन्हा या सर्वांवर दाखल झाल्याने आता सर्वच कुटुंबीयांना आगामी काळात याचा कमालीचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.