
बारामतीत जैन धर्मियांतर्फे उद्या बंदची हाक
बारामती, ता. १९ : जैन धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेल्या श्री सममेद शिखरजी यास पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ बारामती शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने बुधवारी (ता. २१) बारामती बंदचे आयोजन केले आहे.
या निर्णयाच्या निषेधार्थ बारामतीतील सर्व जैन बांधव दिवसभर आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. दरम्यान, शहरातून सकाळी दहा वाजता मोर्चा काढणार असून त्यानंतर जैन समाजाच्या भावनांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना दिले जाणार आहे. हा मोर्चा तीन हती चौकातील श्री महावीर भवन येथून निघणार असून भिगवण चौक, गांधी चौक, गुणवडी चौक मार्गे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर जाणार आहे त्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
श्री सम्मेद शिखरजीला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपूर्ण भारतभर जैन समाजाच्या वतीने निषेध नोंदविण्यासाठी बंदचे आयोजन केले जात आहे.