बारामतीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बारामतीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी
बारामतीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी

बारामतीत डॉक्टरांवर कारवाईची मागणी

sakal_logo
By

बारामती, ता. २६ : वेळेवर उपचार न झाल्याने व उपचारामध्ये हलगर्जीपणा झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची तक्रार गोपाळ तुकाराम गायकवाड (रा. प्रतिभानगर, बारामती) यांनी बारामतीचे उपविभागीय अधिकारी व पोलिस निरिक्षकांकडे दाखल केली असून, हलगर्जीपणा केल्याबद्दल डॉ. तुषार गोविंद गदादे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पोलिस याबाबत तपास करीत आहेत. दरम्यान, या संदर्भात डॉ. गदादे यांनी आरोपांचा इन्कार केला आहे.
याबाबत पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, गोपाळ गायकवाड यांच्या पत्नीला प्रसूतीवेदना सुरु झाल्याने त्यांना डॉ. गदादे यांच्या दवाखान्यात दाखल केले. या वेळी माजी उपनगराध्यक्ष ज्योती बल्लाळ, नवनाथ बल्लाळ, नीलेश मोरे, विशाल गायकवाड हेही उपस्थित होते. गदादे यांनी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रसूती करावी लागेल, असे नमूद केले होते, सिझर करायलाही नातेवाइकांनी मान्यता दिली होती. त्यानंतर डॉक्टर एका कार्यक्रमासाठी निघून गेले, रुग्णाची प्रकृती बिघडल्यानंतर बाळाचे पाय बाहेर आले होते, मात्र वेळेत उपचार न झाल्याने बाळाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी.

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर वैद्यकीय अधीक्षकांकडे पाठविला जाईल. त्यांच्या अहवालानंतर पुढील कारवाई होईल.
- सुनील महाडीक, पोलिस निरिक्षक, बारामती

आरोप निराधार : डॉ. गदादे
संबंधित महिलेच्या बाळाचे प्राण वाचविण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला, यात कसलाही हलगर्जीपणा केलेला नाही, रुग्णाची तब्येत अचानक बिघडली होती, आम्ही सर्व उपचार केले, पण त्यात बाळाचा मृत्यू झाला. आम्ही कर्तव्यात कसूर केलेली नाही, असे डॉ. तुषार गदादे यांनी सांगितले.

मिलिंद संगई, बारामती.