होममिनिस्टर जबाब दो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होममिनिस्टर जबाब दो...
होममिनिस्टर जबाब दो...

होममिनिस्टर जबाब दो...

sakal_logo
By

बारामती, ता. २७ : खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘होममिनिस्टर जबाब दो...’ अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. बारामतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबत बोलताना थेट फडणवीस यांनाच लक्ष्य केले. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरील भूमिकेबाबत जाहीर आभार मानले.
राज्याच्या विविध भागात होणारे हल्ले, महिलांवरील अत्याचार व विविध ठिकाणच्या कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला हवे, हे गृहमंत्र्यांचे अपयश आहे, नागपूरमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस हजर असताना अनेक घटना घडतात. बारामती, पुणे, पालघर ठाण्यातही अनेक घटना घडल्या. मागच्या काळात ते गृहमंत्री असतानाही अशीच परिस्थिती होती, प्रशासन व मंत्री काय करतात? हा प्रश्न आहे.
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, विरोधी पक्ष सातत्याने भूमिका मांडत आहे. राज्य सरकार बोटचेपी भूमिका घेत आहे, मुख्य विषयांना बगल देण्याचे काम सरकारकडून होत आहे.

केंद्र सरकारवर टीका
लोकसभेच्या अधिवेशनात चीन व कोविडवर चर्चा व्हावी, अशी अपेक्षा होती, मात्र दोन्ही विषयांवर केंद्राने चर्चा घेतली नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र व राज्याने काहीही भूमिका घेतली नाही, ही बाबही या निमित्ताने समोर आली. जागतिक महामंदीची चिन्हे दिसत असताना त्याचा नक्कीच काही परिणाम भारतावरही होणार आहे, या संदर्भात केंद्राची योजना तयार हवी, ही बाब आम्ही केंद्राला वारंवार सांगूनही काहीही होत नाही,अशी टीका त्यांनी केली.

अमित शहा यांचे आभार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर महाविकास आघाडीने वेळ मागितल्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तातडीने वेळ दिला, इतकेच नाही तर महाराष्ट्र व कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली, दोन्ही मुख्यमंत्र्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला. तरीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वक्तव्ये केली, हा अमित शहा यांचा तर अपमान आहेच, शिवाय महाराष्ट्राच्या विरोधात कोणीतरी मोठ षडयंत्र रचतय, कोण हे करतय, याचा शोध घ्यावा लागेल, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.