
विद्या प्रतिष्ठानचे श्रमसंस्कार शिबिर उत्साहात
बारामती, ता. ३ : विद्या प्रतिष्ठान कमलनयन बजाज अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच वसंतराव पवार विधी महाविद्यालय, आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने ‘युवकांचा ध्यास, ग्राम शहर विकास’ या उपक्रमांतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिर नुकतेच देऊळगाव रसाळ येथे झाले.
प्राचार्य डॉ. अतुल शहाणे, सरपंच वैशाली वाबळे यांच्या उपस्थितीत शिबिराचा प्रारंभ झाला. या सात दिवसीय शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी पर्यावरण जागृती, मतदार जनजागृती, अन्न सुरक्षा जनजागृती, जल-संधारण, ग्राम-मंदिर स्वच्छता, वृक्षारोपण, ग्रंथ-दिंडी, पथनाट्य, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी समाज प्रबोधनपर उपक्रम राबविले.
स्वयंसेवकांसाठी सातही दिवस योगा व व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, पोलिस निरिक्षक शेख, साळुंखे, जिल्हा समन्वयक डॉ. विलास कर्डिले यांनी शिबिरास भेट दिली. शिबिरासाठी प्राचार्य डॉ. आर. एस. बिचकर, उपसरपंच दत्तात्रेय वाबळे, मुख्याध्यापक तावरे, आनंद रसाळ, दीपक वाबळे यांचे सहकार्य मिळाले.