साबळेवाडीत बेकायदा उत्खनन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साबळेवाडीत बेकायदा उत्खनन
साबळेवाडीत बेकायदा उत्खनन

साबळेवाडीत बेकायदा उत्खनन

sakal_logo
By

बारामती, ता. ६ : साबळेवाडी (ता. बारामती) येथे विनापरवाना गौण खनिजाचे उत्खनन सुरु आहे. या प्रकरणी एका ठेकेदाराने मोठ्या प्रमाणावर उत्खनन करत दगड व इतर साहित्याचा वापर एका रस्त्याच्या कामासाठी केला आहे, असा आरोप करत या प्रकरणी कारवाईची मागणी पोपट धवडे यांनी केली.
ज्या जमिनीत हे काम सुरु आहे, तेथे अकृषिक परवाना नाही, खोदाईसाठी खानपट्टा नाही, प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र नाही, रॉयल्टीही भरलेली नाही, असे असताना चोवीस तास येथून उत्खनन सुरु होते.
धवडे यांनी पाठपुरावा करत महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेत कारवाईसाठी घटनास्थळावर धाव घेतली तेव्हा ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर, डंपर या सारखी वाहने त्यांच्यासमोरुन निघून गेली. मोबाईल क्रशर व जेसीबीसारखी वाहने मात्र तेथेच राहिली.
दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असल्याचे दिसतानाही महसूल विभागाने पंचनाम्यापलिकडे काहीही कारवाई केली नाही, याची चर्चा परिसरात सुरु आहे.
गौण खनिज उत्खनन, क्रशरसाठी ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली नाही, किंवा परवानगीसंबंधी आम्हाला कोणतेही पत्र दिले नसल्याचे सरपंच जी. सी. शिंदे व ग्रामसेवक आर. एन. म्हात्रे यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.

घरापुढे चिखल झाला म्हणून एक ब्रास मुरूम आणला तर थेट फौजदारी कारवाई करणारा महसूल विभाग संबंधितांवर गुन्हे दाखल करत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री, महसूल मंत्री, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे दाद मागणार आहे.
- पोपट धवडे

दरम्यान, या संदर्भात तक्रार आल्यानंतर महसूल विभागाने तेथे असलेल्या यंत्रसामग्री सील करून ताब्यात घेणे गरजेचे असताना तशी कारवाई पाच दिवस उलटूनही का केली जात नाही, हाही एक चर्चेचा मुद्दा आहे.

या तक्रारअर्जानुसार आम्ही संबंधितांना नोटीस दिल्या असून, त्यांचा खुलासा आल्यानंतर याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल.
- विजय पाटील, तहसीलदार, बारामती