कर्ज मिळवून देतो सांगून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कर्ज मिळवून देतो सांगून फसवणूक
कर्ज मिळवून देतो सांगून फसवणूक

कर्ज मिळवून देतो सांगून फसवणूक

sakal_logo
By

बारामती, ता. २५ : बॅंकेतून कर्ज मिळवून देतो, त्याच्या बदल्यात पाच टक्के कमिशन द्यावे लागेल, असे सांगत ५ लाख ३९ हजार रुपये घेत कर्ज प्रकरण न करून देता फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
प्रदीप धोंडीराव आढाव, सुषमा प्रदीप आढाव (रा, बारामती) व राजेंद्र देवराम तेलंग (रा. मेखळी, ता. बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस ठाण्यात राजेश सदाशिव शिंदे (रा. ताटे इस्टेट, पाटस रोड, बारामती) यांनी फिर्याद दिली.
फिर्यादीची सावळ येथे जमीन आहे. तेथे व्यवसायासाठी त्यांना पैशाची गरज होती. या जागेतील १० गुंठे जागा त्यांनी विक्रीला काढली होती. या जागेसंबंधी त्यांची आढाव कुटुंबाशी बोलणी झाली होती, त्यातून त्यांची ओळख झाली होती. त्यांनी आढाव यांना व्यवसायासाठी दीड कोटींच्या कर्जाची गरज असल्याचे सांगितले. त्यावर तेलंग यांनी, ‘मी आजवर अनेकांची कर्ज प्रकरणे केली असून, प्रत्येक बॅंकेत माझे सेटींग आहे, तो माझा व्यवसायच आहे, तुम्ही काळजी करू नका. मी तुमचे दीड कोटींचे प्रकरण मंजूर करून देतो, त्यापोटी ६ लाख रुपये द्यावे लागतील,’ असे सांगितले. पैशाची गरज असल्याने फिर्यादीने ते मान्य केले. कमिशनपोटी २१ एप्रिल २०२२ रोजी प्रशासकीय भवनामध्ये आढाव यांच्याकडे ६९ हजार रुपये रोख स्वरूपात दिली. २९ एप्रिल रोजी बॅंक खात्यावरून २ लाख ३० हजार रुपये तेलंग यांच्या खात्यावर आरटीजीएस केले. ९ मे रोजी पुन्हा २ लाख ४० हजार रुपये आरटीजीएस केले. त्यानंतर दोन महिने ते सातत्याने प्रदीप आढाव व तेलंग यांना कर्जासंबंधी विचारणा करत होते. परंतु समोरून उडवाउडवीची उत्तरे दिली जात होती. ‘आमचे बॅंकांशी बोलणे चालू आहे, कोणती बॅंक कमी व्याज दराने पैसे देतेय, तेथून प्रकरण करून देतो,’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यास सांगितले. परंतु, कोणत्याही बॅंकेकडून कर्ज मिळवून दिले नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी विश्वासघात करून वेळोवेळी पैसे घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.