कोयत्यासह फोटो ठेवलेल्यावर कारवाई

कोयत्यासह फोटो ठेवलेल्यावर कारवाई

बारामती, ता. २७ : ‘कोयता’ या शब्दाला पोलिसांनी आता चांगलेच गांभीर्याने घेतले आहे. बारामतीतील एका युवकाला इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवणे महागात पडले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनाच मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी बारामती शहर पोलिसांना याबाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले.
‘अर्पित मोहिते किंग ऑफ बारामती’ या इन्स्टाग्राम पेजवर कोयत्यासह एका युवकाचा फोटो दिसल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यांनी संबंधितावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे व उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील फौजदार युवराज घोडके, पोलिस अंमलदार दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, दशरथ इंगवले, आकाश सीताप, शाहू राणे यांनी इंस्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवणाऱ्या युवकाचा शोध घेतला.
अर्पित सचिन मोहिते (वय २२, रा. बारामती) याच्याकडे चौकशी केली असता हौस म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्यासोबतचा फोटो क्रेझ म्हणून स्वतःच्या इन्स्टाग्रामवर ठेवला होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, तसेच घरातील कोयताही जप्त केला. सदरची पोस्ट डिलीट केली.

‘सोशल मीडिया जपून वापरा’
या पुढील काळात सोशल मिडीयावर पोलिस बारकाईने लक्ष ठेवणार असून, कोणाच्याही डीपी किंवा स्टेट्स किंवा इतर कोठेही गुन्हेगारी संबंधित मजकूर, हत्यारांबाबतच्या पोस्ट, खुन्नससारखे शब्दप्रयोग असतील; तर त्यांना पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com