
पैसे दुप्पट करून देतो सांगणाऱ्याला अटक
बारामती, ता. २२ : पैसे दाम दुप्पट करून देतो, असे सांगून फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला बारामती शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी सूत्रधार असलेला मुख्य आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. शहर पोलिस त्याचा आता तपास करीत आहेत.
याप्रकरणी दिलीप ईश्वरा सावंत (रा. पलूस, जिल्हा सांगली) यांनी फिर्याद दिली असून, बारामती शहर पोलिसांनी प्रसाद संजय टकले (रा. प्रगती नगर, बारामती) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
‘तुमच्याकडे असलेले पैसे हे दोन नंबरचे असून, मी त्या पैशाचे दाम दुप्पट करून देतो,’ असे फोनवरून आमिष दाखवून दिलीप सावंत यांना प्रसाद टकले यांनी बारामतीत पैसे घेऊन भेटायला बोलावले होते. मात्र, या प्रकरणाची कुणकूण पोलिसांना लागल्यानंतर पोलिसांनी आरोपी व फिर्यादी या दोघांनाही ताब्यात घेऊन पोलिस ठाण्याला आणून त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, संजय जाधव, तुषार चव्हाण, शाहू राणे, अशोक जामदार, अक्षय सिताप यांनी ही कामगिरी केली.