उत्खननाबाबत महसूलमंत्र्यांकडे दाद मागणार

उत्खननाबाबत महसूलमंत्र्यांकडे दाद मागणार

बारामती, ता. १२ : पुराव्यानिशी तक्रारी करूनही महसूल विभाग कारवाईच करत नसल्याने आता महसूलमंत्र्यांकडे थेट दाद मागणार असल्याची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते पोपट धवडे यांनी दिली.
बारामती तालुक्यातील साबळेवाडी हद्दीतून ११ हजार ब्रासहून अधिकचा मुरूम शासकीय परवानगीशिवाय उचलून नेल्याचे प्रकरण धवडे यांनी समोर आणले. याबाबत त्यांनी पुराव्यानिशी महसूल विभागाकडे तक्रारीही केल्या, पण कोणत्याच अधिकाऱ्याचे याबाबत कारवाईचे धाडसच झाले नाही. पुराव्यानिशी शासकीय कागदपत्रांसह माहिती देऊनही अधिकारी वेळकाढूपणा काढत असल्याचे या प्रकरणात स्पष्टपणे दिसत असतानाही याबाबत कार्यवाहीच होत नसल्याचे समोर आले आहे.
शेतातून हा मुरूम उचलला गेला. हे प्रकरण समोर आल्यानंतर शेततळ्याचे काम सुरु असून, त्यासाठी मुरूम काढल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात शेततळ्यासाठीही परवानगीच घेतलेली नव्हती, ही बाब समोर आली. खोदाई करताना संबंधित कंत्राटदारासोबतही करार केलेला नव्हता. त्यामुळे गौणखनिज उत्खननाचा बोजा संबंधित शेतकऱ्यांच्या सात बारा उताऱ्यावर टाकावा, अशी मागणी धवडे यांनी केली आहे.
जिल्हाधिकारी स्तरापर्यंत धाव घेऊन आणि यातबाबी स्पष्ट दिसत असून, कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. उत्खनन करताना जेसीबी, पोकलेन, मोबाईल वाहने, क्रशर आढळल्याचा पंचनाम्यात उल्लेख असताना ही वाहनेही जप्त केली नाही. संबंधित ठेकेदाराला नोटीस देण्याचेही कष्ट केले नाहीत.
यामध्ये शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडाला, बेकायदेशीरपणे मुरूम उत्खनन झाले, या बाबी स्पष्ट असतानाही महसूल विभागाचे सर्वच अधिकारी दबावाखाली कारवाईच करत नाही, अशी स्थिती आहे. तहसीलदारांना या प्रकरणी दंडाचे अधिकार असतानाही दंडच केला जात नाही, हीही आश्चर्यजनक बाब असल्याचे धवडे यांनी नमूद केले.

हे प्रकरण जिल्हा खनी कर्म अधिकाऱ्यांनी पुढील कारवाईसाठी मागवून घेतलेले आहे. ते या प्रकरणी पुढील कारवाई करणार आहेत. आमच्याकडून ते प्रकरण जिल्हास्तरावर गेलेले आहे.
- विजय पाटील, तहसीलदार, बारामती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com