
बारामतीतील रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
बारामती, ता. १० ः शहरातील जुन्या गावठाणासह अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी अशी नागरिकांची मागणी आहे.
उन्हाळा सरत आला पुन्हा पावसाळ्याचे वेध सुरु झाले तरी रस्त्यांची कामे होत नसल्याने लोक हैराण झाले आहेत. जुन्या गावठाणातील सुभाष चौक ते तांदूळवाडी वेस चौक, तांदूळवाडी वेस चौक ते गोकुळवाडी, कचेरी ते गांधी चौक, गांधी चौक ते सुभाष चौक, सुभाष चौक ते राम गल्ली या शिवाय भिगवण चौक ते तारा टॉकीज रस्ता ते कदम चौक, कदम चौक ते पांढरीचा महादेव रस्ता, कारभारी सर्कल परिसर, सम्यक दुकानापासून ते रेल्वे लाईनलगत मेडीकल कॉलेजपर्यंतचा रस्ता यासह अनेक मुख्य रस्ते तर आमराई परिसरातील अनेक रस्त्यांसह शहराच्या विविध उपनगरातील अनेक रस्त्यांवर खड्डे आहेत.
विविध ठिकाणी पाईपलाईनची तसेच काही ठिकाणी गॅस पाईपलाईनच्या कामासाठी रस्त्यांची कामे मागे ठेवल्याचे वारंवार सांगितले गेले. प्रत्यक्षात कोणत्या रस्त्याचे काम केव्हा हाती घेणार व तो रस्ता व्यवस्थित केव्हा पूर्ण होणार याची माहिती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांच्या माहितीसाठी देणे गरजेचे आहे.
नगरपालिकेवर मुख्याधिकारी प्रशासक म्हणून काम करीत असल्याने मुख्याधिकाऱ्यांनी या बाबतची सविस्तर माहिती बारामतीकरांसाठी प्रसिद्ध करणे गरजेचे आहे. रस्त्यांची कामे पावसाळ्यात करणार का, असा नागरिकांचा सवाल आहे. उन्हाळा संपत आला तरी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके रस्ते वगळता इतर रस्त्यांची कामेच होत नाहीत. या उलट रस्ते डागडुजीवरच भर देण्याचे नगरपालिकेचे धोरण आहे.
समन्वयाचा अभाव
बारामती नगरपालिकेने रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सुपूर्द केली आहेत. दुसरीकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाइप टाकायच्या असल्याने रस्ते करता येत नाही अशी सार्वजनिक बांधकाम विभागाची तक्रार आहे. या तिन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र बसून प्रत्येक विभाग त्याचे काम केव्हा करणार याचे वेळापत्रक करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अनेक रस्त्यांची अवस्था खराब असून खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी अनावश्यक गतिरोधक टाकून ठेवल्याने पाठीचा त्रास होतो आहे, मणके दुखतात मनगटही दुखून जाते. सर्वच रस्त्यांचे तातडीने नव्याने डांबरीकरण करावे.
- स्वप्नील भागवत, स्थानिक नागरिक.