
बारामतीत दोन महिलांना दागिने चोरीप्रकरणी अटक
बारामती, ता. १७ : येथील बसस्थानकावर गर्दीचा गैरफायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. एका वाहकाच्या तसेच काही प्रवाशांच्या चाणाक्षपणामुळे या दोन महिला पोलिसांच्या ताब्यात येऊ शकल्या.
यापैकी एक महिला वाळवा (जि. सांगली) तालुक्यातील चिकुर्डे गावातील असून, दुसरी महिला फलटण (जि. सातारा) तालुक्यातील निरगुडी येथील आहे. या दोन्ही महिला संशयितरीत्या प्रवाशांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न करताना सापडल्या. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे दीड तोळ्याचे मंगळसूत्र सापडले.
याबाबत ते कोणाचे आहे, याची माहिती त्या दोघींनाही देता आली नाही. या प्रकरणी पोलिसांनीच फिर्यादी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे.
पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश निंबाळकर, सहायक फौजदार आबा जगदाळे, पोलिस कर्मचारी सुप्रिया कांबळे, ऋतुजा गवळी, संध्याराणी कांबळे हे तपास करीत आहेत.
पोलिसांशी संपर्क साधावा
बसस्थानक परिसरात ज्या महिलांचे दागिने चोरीला गेलेले आहेत, अशा महिला किंवा कुटुंबीयांनी शहर पोलिसांशी संपर्क साधावा. यांच्याकडून अजून काही गुन्हे उघड होतात का याचा तपास सुरु आहे, असे बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांनी सांगितले.