
बारामतीत ३८ लाखांचे भेसळयुक्त पदार्थ जप्त
बारामती, ता. १८ : तालुक्यातील चौधरवस्तीनजिक असलेल्या गोदामातून पोलिसांनी तब्बल ३८ लाखांचे प्रतिबंधित अन्न भेसळयुक्त पदार्थ जप्त केले.
या प्रकरणी दादा ऊर्फ नारायण रमेश पिसाळ (रा. बारामती), शरद सोनवणे (रा. सांगोला, जि. सोलापूर) व प्रशांत गांधी (रा. बारामती) (पूर्ण नावे नाहीत) यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिस कर्मचारी अभिजित एकशिंगे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
दादा पिसाळ याने शरद सोनवणे याच्या सांगण्यानुसार कर्नाटकातून हिरा पानमसाला, रॉयल ७१७ सेंटेड तंबाखू असा ३८ लाख ४० हजारांचा माल आणला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याबाबत कारवाई केली. सदर माल असलेला टेंपो पुढील विक्रीसाठी प्रशांत गांधी यांच्या गोदामात आणून लावण्यात आला होता. सहायक पोलिस निरिक्षक राहुल घुगे पुढील तपास करीत आहेत.