
शासकीय कार्यालय प्रमुखांवरही हेल्मेटबाबत कारवाईचा बडगा
बारामती, ता. २२ : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व वाढत्या रस्ते अपघाताच्या पार्श्वभूमीवर ज्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी हेल्मेटचा वापर करणार नाहीत, अशा कार्यालयाच्या प्रमुखांवर देखील कारवाईची उपप्रादेशिक परिवहन विभागाने तयारी सुरु केली आहे. याबाबतचे पत्र बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी सर्वच शासकीय कार्यालयांना पाठविले आहे.
या संदर्भात पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेटचा वापर महत्त्वाचा आहे, दुचाकी वाहनांच्या अपघातात जखमी होणारे किंवा मृत्यूमुखी पडणारे बव्हतांश लोक हे विनाहेल्मेट असतात, असे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधनात्मक व अंमलबजावणी विषयक व्यापक मोहीम उपप्रादेशिक कार्यालयाने हाती घेतली आहे.
मोटार वाहन कायद्याच्या कलम ‘१९४ ड’नुसार प्रशासकीय कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच इतर नागरिक यांना व त्यांना विनाहेल्मेट येण्याची परवानगी देणाऱ्या अशा दोघांवरही मोटार वाहन कायद्यातील विहित तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे. याबाबत कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासून अशा विनाहेल्मेट दुचाकीस्वारांची यादी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास देण्याचाही फतवा काढला आहे.