‘पीएम किसान’साठी विशेष मोहीम

‘पीएम किसान’साठी विशेष मोहीम

बारामती, ता. २२ : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बारामती उपविभागात ३१ मेपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांनी दिली.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी सहा हजार रुपये लाभ देण्यात येतो. या लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागासह गावातील पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांची जास्तीत जास्त बँक खाती आधार क्रमांकाशी जोडण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
या योजनेअंतर्गत १४व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जूनमध्ये जमा होणार असून, केंद्र शासनाने १४व्या हप्त्याच्या लाभासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. बारामती उप विभागात बारामती तालुक्यात ८ हजार ८५५, दौंड तालुक्यात ९ हजार ६६९, पुरंदर तालुक्यात ८ हजार २०२ आणि इंदापूर तालुक्यात १० हजार ३११, अशी एकूण ३७ हजार ३७ लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

गावातच सोपी प्रक्रिया
यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड मोबाईल क्रमांक इत्यादीच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. हे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने सोपी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com