
खेळण्याच्या वादातून तरुणाला मारहाण
बारामती, ता. ७ ः क्रिकेटचा चेंडू टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर एका युवकास बेदम मारहाण करण्यात झाल्याची घटना तालुक्यातील गुनवडी येथे घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी भूषण संजय गावडे, निखिल संजय गावडे, दीपक ऊर्फ भय्या अनिल वायसे, अण्णा गोरख हारे आणि विनोद पोपटराव गावडे (सर्वजण रा. गुणवडी, ता. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी मारहाण झालेल्या हर्षवर्धन नवनाथ गावडे याने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी क्रिकेट खेळत असताना चेंडू टाकण्याच्या कारणावरून तरुणाला पाच जणांनी कोयता, लोखंडी गजाने बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. गुणवडी (ता. बारामती) येथील जिल्हा परिषद शाळेजवळ (ता. ४) जून रोजी ही घटना घडली. जखमी हर्षवर्धनला सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बारामती पोलिस पुढील तपास करीत आहेत.