
राज्यातील कांदा उत्पादक अडचणीत
चाकण, ता. १५ : मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकाला प्राधान्य दिले. बाजारात सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रामाणात होत असल्याने आठ ते दहा रुपये प्रतिकिलोने कांदा विकला जात आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडल्याची खंत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर यांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
राज्यात पश्चिम, उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातील विविध भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कांदा पिकाला काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला. गेल्या काही महिन्यांत महावितरणकडून भारनियमन करण्यात येत आहे. पिकाला पाणी देण्यासाठी वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. रोगराईचा फटकाही कांदा पिकाला फटका बसला. रासायनिक औषधांच्या फवारणीचा खर्च अशा विविध अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. आता कांदा विक्रीला काढला असता कांद्याचे भाव गडगडले आहेत.
कांद्याचे अर्थचक्र अनिश्चित स्वरूपाचे झाले आहे. जानेवारी ते एप्रिल-मे महिन्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात काढणीस येते. त्या काळात भाव मात्र पडलेले असतात. जुलै-ऑगस्ट महिन्यानंतर कांद्याला चांगले भाव मिळण्यास सुरुवात होते. विक्रमी दर मात्र ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणत असताना शेतकऱ्यांकडे त्यावेळी विकण्यासाठी कांदा उपलब्ध नसतो. याचा फायदा मात्र साठवणूकदार, व्यापारी घेतात. बहुतांश शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची सुविधा नाही. तसेच पैसे गुंतवून ठेवण्याची क्षमता देखील नाही. त्यामुळे मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकून मोकळे होतात हे वास्तव आहे. कांद्याची साठेबाजी करून भाव वाढल्यावर व्यापारी मोठ्या प्रमाणात नफा कमावतात हे भयानक वास्तव आहे. सध्या कांद्याला मातीमोल भाव मिळत आहे. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याचे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी व्यक्त केले.
एकरी ४० हजार रुपयांचा खर्च
कांद्याच्या लागवडीसाठी बियाणे, खते, रासायनिक औषधे, मजुरी आदींचा सुमारे ४० हजार रुपयांचा एकरी खर्च येतो. साधारणपणे एकरी ७५ ते १५० क्विंटल कांद्याचे उत्पादन होते. चांगली जमीन व योग्य हवामान असल्यास काही भागात दोनशे क्विंटलपर्यंत कांद्याचे उत्पादन जाते. घाऊक बाजारात अगदी आठ ते दहा रुपये किलोचा दर मिळत आहे. व्यापारी हलक्या दर्जाचा कांदा घेण्यास नकार देत आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे वखारीत साठविलेला कांदा सडण्याचे प्रमाण वाढत आहे.
खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले बाजार आवारात शनिवारी तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याला घाऊक बाजारात प्रति किलोला सहा ते दहा रुपये भाव मिळाला. सध्या नीचांकी भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. याकडे केंद्र व राज्य सरकारने लक्ष द्यावे.
विनायक घुमटकर, सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती.
Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02004 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..