राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे
राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे
राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे

राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे

sakal_logo
By

लोगो- स्मरण स्वातंत्र्यवीरांचे

राष्ट्रसेवा दलाचा सच्चा कार्यकर्ता : मामा शिंदे

चाकण येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. दत्तात्रेय भिकोबा तथा मामा शिंदे यांनी समाजसेवा, आपल्या स्वच्छ व पारदर्शी मनाचा व कामाचा ठसा जनमानसात उमटवला होता. तळागाळातील शेवटच्या माणसासाठीसुद्धा त्यांनी काम केले. समाजवादाचा खरा चेहरा त्यांनी लोकांपुढे आणला. समाज परिवर्तनाचा ध्यास घेऊन कार्य करणारा सच्चा कार्यकर्ता म्हणजे मामा होते. त्यांनी नोकरी, शेती, व्यवसाय करून पैसे कमावत आयुष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्याचे सोडून
फक्त राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचे काम शेवटच्या श्वासापर्यंत केलं. साधी राहणी, खादीचा पेहराव, ही मामांनी आयुष्यभर ओळख राहिली. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यांच्या हस्ते पहिला झेंडा चाकण पोलिस ठाण्यात
फडकावला.

- हरिदास कड, चाकण

खेड तालुक्यातील चाकण येथील स्वातंत्र्यसैनिक स्व. दत्तात्रेय भिकोबा तथा मामा शिंदे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेती करताकरता कांद्या-बटाट्याचा व्यापारही करत होते. जोडीला सावकारी करत असल्याने अनेक लोकांच्या जमिनी त्यांच्याकडे गहाण असत. मामा हे आईच्या गर्भात असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांची आजी, आई व आत्या यांनी संसाराची धुरा पेलत असताना लोकांच्या गहाण असलेल्या जमिनी परत केल्या. दरम्यान, १८ मे १९२९ रोजी मामांचा जन्म सासवडला (ता. पुरंदर) त्यांच्या आजोळी झाला. याच काळात स्वातंत्र्यलढ्याला सुरवात झाली होती. मामांचे काका आणि मावशी या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना राष्ट्रनिष्ठेचे बाळकडू घरातून मिळाले. त्यांना सुभाषचंद्र बोस यांना जवळून पाहता आले.

मामांचे शालेय शिक्षण चाकण आणि पुण्यात झाले. सन १९४५ आणि सन १९५३ मध्ये एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रसेवा दलाचे शिबिर खेड तालुक्यात घेण्यात आले होते. यामध्ये मामांचा पूर्ण सहभाग होता. या काळात त्यांना शिरुभाऊ लिमये, ग. प्र. प्रधान, भाऊ रानडे यांचा सहवास लाभला. आचार, विचारांचा शुद्धतेचे संस्कार याच शिबिरात मामांना मिळाले. समाजवादी समाजरचना या विचारांचा पाया याच शिबिरात रचला गेला. आयुष्यभर याच विचारामूल्यांच्या प्रकाशात मामांची वाटचाल झाली. सन १९४२च्या स्वातंत्र्य चळवळीतील महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, साने गुरुजी, गाडगेबाबा आदींच्या आचार विचारांची शिकवण मामांना लाभली. त्यामुळे त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत स्वतःला झोकून देऊन सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. हरिजनांना मंदिर प्रवेश मिळावा म्हणून क्रांतिसिंह नाना पाटील व साने गुरुजींना चाकणमध्ये ते घेऊन आले. संत गाडगेबाबा यांच्या बरोबर गाव स्वच्छतेसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. प्रौढ शिक्षण वर्ग चालविणे, असे अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबविले.

झेंडा फडकावण्याचा मान
राष्ट्र सेवा दलामुळे त्यांना झेंडा कसा वर चढवायचा व त्याला कशी सलामी द्यायची, याचे ज्ञान होते. त्यामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी चाकण पोलिस ठाण्याचा पहिला तिरंगा फडकविण्याचा व झेंडावंदनाचा मान वयाच्या १७व्या वर्षी त्यांना मिळाला होता. त्याच्या आदल्या दिवशीच पोलिस अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्याचे काम त्यांनी केले होते. तरीही हा स्वातंत्र्याचा झेंडा तुम्हीच फडकवा, असा आग्रह पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता.

जनतेच्या अंतःकरणात जागा
संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ६ फेब्रुवारी १९५६ रोजी सुरू झाली. त्यात थेट सहभाग घेतल्याने मामांना तुरुंगवास भोगावा लागला. वीस दिवसांची कारावासाची शिक्षा त्यांनी येरवडा कारागृहात भोगली होती. सन १९५७ मध्ये जिल्हा लोकल बोर्डाचे प्रतिनिधित्व करून मामांच्या राजकीय कारकिर्दीला सुरवात झाली. या व्यासपीठाचा उपयोग त्यांनी समाजाभिमुख कामांसाठी केला. त्यामुळे त्यांच्या कार्याला समाजमान्यता मिळाली. त्यानंतर त्यांनी दोन पंचवार्षिक खेड तालुका पंचायत समितीचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी सन १९६७
मध्ये समाजवादी पक्षाकडून आणि सन १९७७-७८ मध्ये अपक्ष, अशी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली. त्यात जरी त्यांना यश मिळाले नाही, तरी ते खचून गेले नाहीत. या राजकीय वाटचालीत अनेक प्रकारची प्रलोभने त्यांनी दूर सारल्यानेच लोकांच्या अंतःकरणात जागा घेऊन, त्यांच्याच मदतीने राजकारण आणि समाजकारण करणारे ‘मामा’ हे एक उत्तम उदाहरण ठरले होते.

शिक्षण प्रसाराचा ध्यास
चाकणला माध्यमिक शाळेची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना पुण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. गावातील एका सभेत चाकणला शिक्षण संस्था सुरू करण्याची आग्रही मागणी मामांनी लावून धरली. त्यावेळचे जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री भाऊसाहेब हिरे यांना मामांनी शाळेचा विचार सांगताच त्यांनी त्वरित शाळा काढण्यास परवानगी दिली. ८ सप्टेंबर १९५४ रोजी चाकण गावात जनता शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यामंदिर सुरू करण्यात आले. यावेळी शालेय विद्यार्थी आणण्यासाठी परिसरातील वाड्यावस्त्यांवर सायकलवर मामांना फिरावे लागले होते. त्याकाळी मुलींच्या घरच्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यावेळी कुठे सहा मुली शाळेत प्रवेश घेऊ शकल्या.

समाजसेवेत अग्रेसर
शेतकरी संघटनेचा सन १९७८ मध्ये उदय झाला. शरद जोशी यांनी मामांना बरोबर घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी याच संघटनेच्या माध्यमातून सुरवात केली. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी काम करण्यास सुरवात केली. शेतकरी संघटनेने चाकणला कांदा आंदोलन केले. त्यात मामांनी स्वतःला झोकून दिले. या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारने कांद्याला १५ रुपये क्विंटलचा भाव ४० रुपये केला होता. या आंदोलनाची चर्चा जगभर झाली. त्यानंतर चाकणच्या चक्रेश्वर देवस्थान, ट्रस्ट, मारुती मंदिर ट्रस्ट यावर ट्रस्टी म्हणून मामांनी काम केले. मामांनी काही काळ ‘मा केअर’ या खासगी कंपनीत नोकरीही केली. त्यांच्यातील चिकाटी, सचोटी आणि प्रामाणिकपणा पाहून कंपनी मालकाने कंपनीचा सर्व कारभारच मामांच्या ताब्यात दिला होता. नोकरी करत असतानाच सततच वेगवेगळ्या प्रकारे लोकांची सेवा करण्याचे काम सुरू ठेवले होते. घरची जमीन विकून आलेल्या पैशाच्या वाटणीतून कुटुंबातील सर्वांच्या परवानगीने ‘दुर्गाई हृदय प्रतिष्ठान’ ही संस्था सुरू केली. माझ्याकडे आलेले पैसे ते समाजाचे आहेत, हे समजून याच संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब लहान मुलांच्या हृदय रोगावर उपचार करण्यासाठी आर्थिक मदत देण्याचे कार्य आजही त्यांचा मुलगा राजेंद्र व इतर सहकारी करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02161 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..