चाकण परिसरातील रस्त्यांवर पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण परिसरातील रस्त्यांवर पाणी
चाकण परिसरातील रस्त्यांवर पाणी

चाकण परिसरातील रस्त्यांवर पाणी

sakal_logo
By

चाकण, ता. ८ : खेड तालुक्यातील चाकण व परिसरातील गावात दोन दिवसांपासून दिवसा व रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे परिसरातील काही शेतांत व रस्त्यावर पाणी साचले आहे. तसेच, विहिरींना पाझर फुटले आहेत. तसेच, या पावसामुळे काही पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, रात्रीच्या पावसामुळे गणेशोत्सव मंडळांचे देखावे पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना निराशा पत्करावी लागत आहे.
या पावसामुळे माळरानावरील सोयाबीनच्या पिकांना जीवदान मिळालेले आहे. बाजरी, वाल तसेच इतर बागायती पिकांसाठी पाऊस समाधानकारक ठरला आहे. काही शेतात पाणी साचल्याने पिकांची मुळे सडू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. सखल भागातील जमिनीत पाणी साचल्याने शेतपिकांना धोका निर्माण झाला आहे. वखारी व छपऱ्यात साठवलेला कांदा या पावसाने आणि ढगाळ हवामानामुळे व आद्रतेमुळे सडू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे शेतकरी हनुमंत गाडे व पोपट पवार यांनी सांगितले.
या पावसामुळे ओढ्यांना पूर आले आहेत. तळी, पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढलेली आहे. परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यात पाणी साचल्याने वाहन चालकांना त्या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातून अपघात होत आहेत. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर, ट्रक, बस या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात आदळत आहेत. रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे खड्ड्यात दुचाकी वाहने अडकत आहेत. या खड्ड्यांमुळे छोट्या मोटारींचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील व शेतातील झाडे पडली आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Chn22b02232 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..