कांद्याचा बाजारभाव वधारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याचा बाजारभाव वधारणार
कांद्याचा बाजारभाव वधारणार

कांद्याचा बाजारभाव वधारणार

sakal_logo
By

चाकण, ता. २७ : राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक सध्या घटत आहे. यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे पीक तसेच बराकीत साठविलेला कांदा सडला आहे. त्याचा थेट परिणाम आवकेवर झाल्याचे चित्र आहे. पाकिस्तान तसेच इतर राज्यातून होणारी आवकही घटली आहे. यामुळे दसरा, दिवाळीनंतर कांदाच्या भावात ३५ ते ४० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता चाकण तसेच इतर बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे.

कांद्यास सुमारे प्रति किलोस २० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. निर्यातही घटली आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढतील की नाही या संभ्रमात शेतकरी आहेत. परंतु देशभरात पाकिस्तानातून कांद्याची आवक सध्या कमी होत आहे तसेच पावसाचे प्रमाण दोन्ही देशात वाढल्याने कांदा पुन्हा एकदा दिवाळीनंतर महागणार आहे, असे दुबईतील व्यापारी शरीफ व इतरांनी सांगितले.

नाशिक तसेच चाकणच्या महात्मा फुले कांदा बाजारात सध्या कांद्याचे भाव १५ ते १८ रुपयाच्या आसपास आहेत. पावसामुळे बराकीत साडविलेला जुना कांदा भिजला व सडला आहे. यामुळे येत्या दसरा, दिवाळीपर्यंत किरकोळ बाजारात कांद्याचे ४० रुपयांपर्यंत जातील, अशी शक्यता काही व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. महाराष्ट्रात नवीन कांद्याची काढणी नोव्हेंबर, डिसेंबरला सुरू होईल. त्यामुळे नव्या कांदा काढणीला अजून दोन, अडीच महिना बाकी आहे. त्यामुळे कांद्याचे भाव वाढू शकतात, असे एका व्यापाऱ्याने ''सकाळ''शी बोलताना सांगितले.


पावसाने कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच वखारीतील कांदा सडल्याने कांद्याची आवकही घटली आहे. कर्नाटक राज्यातील कांदा बाजारात विक्रीसाठी सध्या येत नाही. तो कर्नाटकातच विकला जातो. सध्या वखारी, छपऱ्यात ठेवलेला कांदा सध्या विक्रीस येतो आहे. तोही मोठ्या प्रमाणात सडला आहे. त्यामुळे भाव घसरत आहे. कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
- माणिक गोरे, कांदा व्यापारी
......................
मागील सहा महिन्यांतील आवक व बाजारभाव (रुपयांत)
एप्रिल ....५४,००० क्विंटल ...१३ रुपये
मे.....२४,००० क्विंटल ...१३ रुपये
जून...१५,००० क्विंटल ..८ ते १७ रुपये
जुलै...१३,००० क्विंटल ...८ ते १७ रुपये
ऑगस्ट...१४,००० क्विंटल ...८ ते १७ रुपये
सप्टेंबर...७,००० क्विंटल ...८ ते १७ रुपये

गेल्या पाच महिन्यापासून कांद्याचे भाव स्थिर आहेत.परंतु आवक घटते आहे.यावर्षी मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याने बाजारातील आवक घटली आहे .तसेच नवीन पीक येण्यास उशीर झाला आहे.
- बाळासाहेब धंदे,सचिव, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती