
खाद्यतेलाचे दर घसरल्याने दसरा- दिवाळी होणार गोड
चाकण, ता. २७ : राज्यात खाद्यतेलाचे भाव वीस ते पंचवीस टक्क्यांनी उतरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारा फटका काही प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळे दसरा दिवाळी सण गोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे व्यावसायिक धीरज कर्नावट यांनी सांगितले.
राज्यात खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने तेल वापरावर मर्यादा आल्या होत्या. अगदी वडापाव, भजीचे भाव वाढले होते. दसरा- दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाचे दर आतापर्यंत वीस ते पंचवीस टक्क्यांनी घसरले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला लागणारी कात्री काही प्रमाणात कमी झाली आहे. खाद्यतेला बरोबर नवरात्रीसाठी खजूर, रताळ्याची आवकही बाजारात वाढली आहे. खजूर २७० रुपये प्रति किलो तर रताळ्याचे भाव प्रति किलोला ६० रुपये पर्यंत आहे. तेलाच्या किमती वाढत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले होते. दसरा दिवाळीच्या सणाच्या तोंडावर खाद्यतेलाच्या किमती घसरू लागल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सध्या बाजारात तेलाचे असलेले दर
खाद्यतेल १५ लिटर २४०० रुपये डबा (एक लिटर १६० रुपये), १५ लिटर २७०० रुपये शेंगदाणा तेल डबा, सोयाबीन तेल दोन हजार रुपये १५ लिटर डबा,.