
चाकणमध्ये दोघांना हप्त्यासाठी मारहाण
चाकण, ता. २७ : चाकण (ता. खेड) येथील एकता नगर येथे एका पान टपरी चालकाला व त्याच्या मावस भावाला, ‘ एक हजार रुपयाचा दर महिन्याला हप्ता दे, नाहीतर तुझी पान टपरी जाळून टाकीन,’ अशी धमकी देत लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पान टपरी रस्त्यावर फेकून दिली व नुकसान केले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. किशोर पाटील (वय २३, रा. एकतानगर, चाकण), मेहबूब मकबूल नदाफ (वय २१, रा. वाकी खुर्द, ता. खेड), अशी अटक केल्यांची नावे असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शनिवारी (ता. २४) पुणे नाशिक महामार्गावर एकता नगर येथे रात्री साडेआठच्या सुमारास ‘ओमसाई पान स्टॉल’ या पान टपरीवर घडला. फिर्यादी कृष्णा शिंदे व त्याचा मावस भाऊ जयेश कांतिलाल पवार हे दोघे पान टपरीवर बसलेले असताना आरोपींनी रिक्षातून येऊन पैशाची मागणी करून या दोघांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच, चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. या दोघा आरोपींनी व त्यांच्या दहा-बारा मित्रांनी येऊन जयेश याचा शोध घेतला, तो मिळून न आल्याने भांडणाचा राग मनात धरून सोमवारी (ता. २६) कृष्णा याला हाताने लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच, दर महिन्याला एक हजार रुपये हप्ता दे, नाहीतर तुझी टपरी जाळून टाकीन,’ असे म्हणून टपरी रस्त्यावर फेकून नुकसान केले व दहशत निर्माण केली.