चाकण परिसरात फोफावतेय बालगुन्हेगारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण परिसरात फोफावतेय बालगुन्हेगारी!
चाकण परिसरात फोफावतेय बालगुन्हेगारी!

चाकण परिसरात फोफावतेय बालगुन्हेगारी!

sakal_logo
By

चाकण, ता. १६ : चाकण व परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रकार पाहिले, तर त्यात सहभागी असणारी मुले ही अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांनी चाकण परिसरात चार खून केलेले आहेत. नुकताच झालेला रोहकल फाटा येथील खुनातील सर्व आरोपी हे अल्पवयीन मुलेच आहे. त्यामुळे पोलिसांच्याही डोकेदुखीत वाढ झाली आहे.


चाकण औद्योगिक वसाहत व चाकण परिसरामध्ये बकालीकरण सध्या वाढले आहे. देशातून येथे कामगार वर्ग राहण्यास आला आहे. परिसराचे सध्या निमशहरीकरण झाले आहे. ‘इझी मनी’ मिळविण्यासाठी जो-तो धडपड करू लागला आहे. अल्पवयीन मुले शाळा, कॉलेजात न जाता एकत्र गट करून वावरत आहेत. सोशल मीडियावर ही मुले ॲक्टिव्ह आहेत. कधी शाळा-कॉलेजच्या बाहेर बसून टुकारपणे बाईक फिरवत आहेत. मुलांचा वेगवेगळा फंडा येथे चालतो आहे. अल्पवयीन मुलांच्या टोळ्या येथे निर्माण होत आहेत. त्यांना पोसणारे काही तरुण, गॉडफादर आहेत. सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह असल्याने अनेक ग्रुप व्हाट्सअपवर कार्यरत आहेत. त्यातून वेगवेगळ्या पोस्ट केल्या जात आहेत.

औद्योगिक वसाहतीत अगदी ठेकेदारी मिळविण्यासाठीही अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो. अल्पवयीन मुलांना अटक केली जात नसल्याने खुनाच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुले सातत्याने सहभागी असतात. पंधरा ते अठरा वर्षांची मुले यामध्ये विशेष सहभाग घेतात.

चौदा ते अठरा वर्षे वयोगटातील मुले विनयभंग, चोरी, लूटमार, बेकायदा शस्त्र बाळगणे, हाणामारी यांमध्ये यांचा सहभाग वाढतो आहे. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संस्कारांचा अभाव आणि वाईट संगतीमुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी तसेच इझी मनी मिळविण्यासाठी अल्पवयीन मुले चोरी करतात, तसेच हाणामाऱ्या, खुनाचे प्रकार करीत आहेत. काही अल्पवयीन मुले, ग्रुप अगदी खुनाच्याही सुपारी घेतात.

-----------------
कायद्याचे संरक्षण
अल्पवयीन मुलांना एखाद्या खूनप्रकरणी किंवा इतर गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून घ्यावे लागते. अशा अल्पवयीन मुलांना खून आदी गुन्हा केल्यानंतर बाल न्याय मंडळासमोर हजर केले जाते. अठरा वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा ‘विधीसंघर्षग्रस्त’ बालक म्हणून उल्लेख केला जातो. त्यांना कायद्याने मोठे संरक्षण दिले आहे. अल्पवयीन मुलांना बालनिरीक्षण गृहात ठेवले जाते. पालकांच्या संमतीने किंवा चांगल्या वागणुकीच्या हमीवर त्यांना सोडून दिले जाते. ‘काही होत नाही’ अशी भावना मुलांच्या मनात होत असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ होत आहे.
--------------------
चाकण परिसरातील गुन्ह्यांमध्ये बहुतांश आरोपी हे अल्पवयीन मुले आहेत. मुलांना अटक केली जात नसल्याने चौकशी करून त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले जाते, त्यामुळे ते सातत्याने गुन्हे करतात. गुन्ह्यांवर वचक ठेवण्यासाठी अल्पवयीन मुलांच्या वयोमर्यादेमध्ये बदल करणे आवश्यक आहे. - किशोर पाटील, पोलिस निरीक्षक