Pune दिवाळीच्या तोंडावर कांदा तेजीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

onion
दिवाळीच्या तोंडावर कांदा तेजीत

Pune : दिवाळीच्या तोंडावर कांदा तेजीत

चाकण : येथील महात्मा फुले बाजारात कांदा वखारीत साठविलेल्या दीडशे टन कांद्याची आवक झाली. नवीन कांद्याची आवक अजिबात झालेली नाही. कांद्याला प्रति किलोला भाव १६ ते २३ रुपये मिळाला, अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर दिली.

चाकण (ता. खेड) येथील महात्मा फुले बाजारातील भावाच्या चढ-उतारावर राज्यातील कांद्याचे भाव ठरतात. राज्यात परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांदा लागवडी रेंगाळल्या आहेत. त्यामुळे यंदा कांदा दोन महिने उशिरा अगदी फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी येणार आहे. सध्या बाजारात वखारीत साठवलेला कांदा विक्रीसाठी येत आहे. हा कांदा स्थानिक परिसरातीलच आहे, असे व्यापारी जमीर भाई काझी, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी सांगितले.

राज्यात अवकाळी व परतीच्या पावसाने साठविलेला कांदा मोठ्या प्रमाणात सडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्यातील काही व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठविला. नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा साठवला आहे. त्यांचेही नुकसान झाले. तसेच व्यापाऱ्यांचाही कांदा बाजारात विक्रीसाठी येत आहे.

कांद्याची निर्यात सध्या होत नसल्याने कांदा देशांतर्गत विक्री होत आहे. कांद्याचे भाव मागे गडगडले होते. कांद्याचे मागील आठवड्यात भाव प्रति किलोला आठ ते तेरा रुपये किलो दराने होते. ते भाव या आठवड्यात अगदी दहा रुपये किलोला वाढले आहेत. कांद्याचे भाव पाऊस असाच पडला तर मोठ्या प्रमाणात वाढतील .त्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकाला देशात बसू शकतो असे व्यापारी जमीर भाई काझी, विक्रम शिंदे यांनी ''सकाळ ''शी बोलताना आज सांगितले.

परतीच्या पावसामुळे लागवडी खोळंबल्या


खेड तालुक्यात कांद्याची रोपे साधारणपणे जुलै, ऑगस्टमध्ये टाकली जातात. परंतु परतीच्या पावसाने जुलै, ऑगस्टमध्ये टाकलेल्या कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कांदा रोपांच्या लागवडी खोळंबल्या आहेत. पुन्हा कांद्याची रोपे टाकण्यात आली आहे. ती रोपे पाऊस पडला नाही तर वाचतील, असे शेतकरी सत्यवान काटकर, लक्ष्मण कामठे, शंकर मलगे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

ऑक्टोबर,नोव्हेंबर महिन्यात काढणीस येणारे कांदा पीक जानेवारी,फेब्रुवारी महिन्यात काढणीस येईल त्यामुळे कांदा बाजारात विक्रीसाठी दोन महिने उशिरा येणार आहे. त्यामुळे साठविलेल्या कांद्याचे भाव वाढतील.
- एकनाथ काटकर, कांदा उत्पादक