चाकण येथे वाहनचालक, कामगार हैराण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथे वाहनचालक, कामगार हैराण
चाकण येथे वाहनचालक, कामगार हैराण

चाकण येथे वाहनचालक, कामगार हैराण

sakal_logo
By

चाकण, ता,१६ : चाकण- शिक्रापूर मार्ग, चाकण -तळेगाव मार्ग, पुणे, नाशिक महामार्ग, चाकण- आंबेठाण मार्ग या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी पहावयास मिळते. येथे दररोज सकाळ तसेच संध्याकाळी दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. यामुळे चाकण (ता. खेड) येथील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी का प्रयत्न करीत नाहीत असा सवाल कोंडीमुळे हैराण झालेले नागरिक, वाहनचालक, कामगार करत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गाचे काम तसेच चाकण-तळेगाव शिक्रापूर मार्गाचे काम मार्गी लागावे यासाठी नेत्यांचे प्रयत्न सुरू असले तरी जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत काही खरे नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. औद्योगिक वसाहतीमुळे तसेच रांजणगाव औद्योगिक वसाहत, तळेगाव, मावळ औद्योगिक वसाहत, नगर, मुंबई, नाशिक, मराठवाडा या ठिकाणची वाहने मोठ्या प्रमाणात या मार्गाने रोज धावतात. या मार्गावर दररोज पंचवीस हजारावर वाहने धावत असल्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या मार्गावर अवजड वाहने यामध्ये कंटेनर, ट्रेलर, ट्रक, बसेस आदी व इतर वाहने धावतात. त्यामुळे वाहने वळताना चौकात तसेच वळणाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी सातत्याने होते. वाहने वळताना तसेच वाहनांची ओव्हर टेक होत असताना ही वाहतूक कोंडी पहावयास मिळते. चाकण येथे तळेगाव चौकात, आंबेठाण चौकात तसेच पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा, कुरुळी फाटा, एमआयडीसी फाटा, चिंबळी फाटा, बालाजीनगर फाटा, बंगला वस्ती फाटा या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दररोज होते. वाहतूक विभागाच्या वतीने वाहतूक नियंत्रणाचे काम जरी होत असले तरी अरुंद रस्ते, अवजड वाहने यामुळे वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे.
दरम्यान, वाहतूक कोंडी सुटण्यासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते, वाहतूक विभागाचे उपायुक्त आनंद भोईटे, तत्कालीन पोलिस निरीक्षक सुनील गोडसे,पोलिस उप निरीक्षक चंद्रशेखर चौरे यांनी व इतरांच्या सहकार्याने वाहतूक नियंत्रण दिवे काही ठिकाणी बसवून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये चाकण येथील माणिक चौकातून एकेरी मार्ग काढून ती वाहतूक पुणे-नाशिक मार्गाला जोडली गेली. त्यामुळे वाहतूक कोंडीत थोडाफार फरक पडला आहे. माणिक चौकामध्ये जुन्या पुणे रस्त्यावर अवजड वाहने जाताना कंटेनर लवकर वळत नाही. यामुळे कोंडीत भर पडते.

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. रस्ते अरुंद व वाहने जास्त अशी अवस्था येथे आहे. प्रयत्न सुरू असले तरी वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी होते. अवजड वाहने मोठ्या प्रमाणात आहेत. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून दिला जातो.
- शंकर डामसे, वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक, चाकण

04217