खालुंब्रे, महाळुंगेतील दोन पूल धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खालुंब्रे, महाळुंगेतील दोन पूल धोकादायक
खालुंब्रे, महाळुंगेतील दोन पूल धोकादायक

खालुंब्रे, महाळुंगेतील दोन पूल धोकादायक

sakal_logo
By

चाकण, ता. १३ : चाकण-तळेगाव मार्गावरील खालुंब्रे व महाळुंगे येथील दगडी पुलांच्या बांधकामाला सुमारे ८० वर्षे झाली आहेत. दुरवस्थेमुळे या दोन्ही पूल धोकादायक बनले आहेत. पुलांच्या बांधकामात झाडे झुडपे वाढलेली आहेत. अवजड वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी प्रवासी तसेच स्थानिक नागरिक करीत आहेत.

धोकादायक पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे अशी मागणी जोर धरत आहे. या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरलऑडट केव्हा झाले हेही कळत नाही हे भयानक वास्तव आहे. पुलांच्या क्षमतेपेक्षा या पुलावरून एका वेळेस शंभर टन वजनाच्याही अवजड कंटेनर टेलर जातात ते चित्र आहे. त्यामुळे या पुलांना कधीही धोका उद्भवू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे

चाकण व तळेगाव, मावळ येथे औद्योगिक वसाहत झाल्यानंतर या दोन्ही पुलांवरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामध्ये अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. चाकण तळेगाव मार्गाचे ज्यावेळी बीओटी तत्त्वावर काम करण्यात आले त्यावेळी या पुलाच्या बांधकामाला काही धक्का न देता बाजूने फक्त काम करण्यात आले. या पुलाचे काही ठिकाणी बांधकाम पडले आहे तसेच काही ठिकाणी तडे गेले आहेत. हे पूल जुने झाले आहेत. या पुलाच्या बांधकामावर झाडे,झुडपे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, अशी माहिती शिवसेनेचे माजी उपसभापती अमोल पवार यांनी दिली.

खालुंब्रे येथे तर पुलाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्यामुळे तेथे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. दोन्ही पूल ओढ्यावर आहे त्या ओढ्यांची खोली अगदी शंभर फूटावर आहे. त्यामुळे हे दोन्ही पूल खोल आहेत. या दोन्ही पुलांची कामे नव्याने करून पर्यायी पूल या ओढ्यावर बांधावेत, अशी मागणी नागरिकांतर्फे काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष भास्कर तुळवे यांनी केली आहे.

या दोन्ही पुलांची डागडूजी करावी व या दोन्ही पुलांना नवीन पर्यायी पूल उभारण्यात यावे. हे दोन्ही पूल धोकादायक झाले आहेत त्यामुळे बांधकाम विभागाने लवकर या पुलांच्या उभारणीचा निर्णय घ्यावा.
- शिवाजी वर्पे, माजी सदस्य, खेड पंचायत समिती


खालुंब्रे व महाळुंगे येथील पूल जुने आहेत. त्यांची नव्याने दुरुस्ती करण्यात येणार आहे. जास्त खोल असल्याने तेथे मशिन वगैरे नेता येत नाही त्यामुळे त्यांची कामे रखडलेली आहेत. त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात येणार आहे.
- राहुल कदम, उपकार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग

04417