
शेलपिंपळगाव पुलावर नित्याची वाहतूक कोंडी
चाकण, ता. २ : चाकण-शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगाव (ता. खेड) गावच्या हद्दीत भीमा नदीच्या पुलापासून शेलपिंपळगाव, शेलगाव, दत्तवाडी, भोसे या परिसरात अगदी दोन किलोमीटरवर वाहनांच्या रांगा दररोज लागतात. साबळेवाडी घाट वळण तसेच बहुळ परिसरातही वाहनांच्या रांगा लागतात. यामध्ये अवजड वाहने कंटेनर, ट्रेलर, ट्रक मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीने नागरिक, कामगार, शेतकरी, प्रवासी हैराण झाले आहेत.
संबंधित अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांची, वाहन चालकांची कामगार, प्रवासी, शेतकरी यांची आहे. चाकण- शिक्रापूर मार्गावर दररोज संध्याकाळी तसेच दिवसा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी शेलपिंपळगाव ते शेलगाव, वडगाव आळंदी फाटा, दौंडकरवाडी फाटा, मोहितेवाडी फाटा या परिसरात मोठ्या प्रमाणात होते. हा मार्ग चाकण औद्योगिक वसाहत, रांजणगाव औद्योगिक वसाहत तसेच नगर, मराठवाडा, मुंबई मार्गाला जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावरून कंपन्यांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. या मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागतात. तसेच या मार्गावर सातत्याने छोटे-मोठे अपघात घडतात. अनेक ठिकाणी मार्गावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहतूक मंद गतीने चालते. गेली अनेक वर्ष या मार्गाचे काम होत नाही तसेच दुरुस्ती कडेही लक्ष नाही त्यामुळे या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
शेलपिंपळगाव,शेलगाव परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. भीमा नदीवरील पुलावर वाहतूक कोंडी होते. भीमा नदीवरील पूल हा अरुंद आहे. वाहन चालक वाहन पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहतूक कोंडी पुलावर मोठ्या प्रमाणात होते. भीमा नदीच्या पुलाच्या सुरुवातीला पश्चिम बाजूला वडगाव फाटा आहे. त्या ठिकाणी वडगाव, आळंदी मार्गाकडे वाहने वळताना वाहतूक कोंडी होते. या मार्गावर वडगाव फाटा येथे दोन वाहतूक पोलिस कर्मचारी तसेच दौंडकरवाडी फाटा या परिसरात दोन वाहतूक पोलिस कर्मचारी वाहतूक पोलिस विभागाने ठेवावे. पोलिस आयुक्तांनी या मागणीकडे लक्ष द्यावे नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असे रामहरी आवटे यांनी सांगितले.
चाकण- शिक्रापूर मार्गावर शेलपिंपळगाव येथे मार्गाला खेटून जवळच मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे शासनाने काढण्याची गरज आहे. शेलपिंपळगाव, शेलगाव परिसरात मार्ग रुंद होण्याची गरज आहे. केंद्र सरकारने या मार्गाकडे लक्ष द्यावे. संबंधित विभागांनी लक्ष द्यावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा मी केलेला आहे.
-दिलीप मोहिते, आमदार, खेड
या मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. त्यामुळे रुग्णवाहिका अडकून बसतात. रुग्णांचे जीव योग्य वेळेवर उपचार न मिळाल्याने जातात. चाकण शिक्रापूर मार्गाचे काम कधी सुरू होणार हा प्रश्न आहे. मार्गाचे काम संबंधित विभागाने लवकर मार्गी लागावे अन्यथा अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला जाईल.
-प्रकाश वाडेकर
भामा नदीवरील पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत मोठ्या प्रमाणात अवजड वाहने असल्याने इतर वाहन चालकांना याचा त्रास होतो. या मार्गाच्या कामाकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ लक्ष द्यावे.
-बाबाजी काळे, माजी सदस्य, जिल्हा परिषद
शेलपिंपळगाव येथे सातत्याने वाहतूक कोंडी होते. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथे सातत्याने अपघात होतात. यासाठी या रस्त्याचा दशक्रिया विधी या अगोदर केला आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष का जात नाही. हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गाचे काम लवकर झाले नाही तर तीव्र आंदोलन करून रस्ता बंद केला जाईल.
-श्रीनाथ लांडे, सामाजिक कार्यकर्ते
या मार्गाच्या दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदाराने करावयाचे आहे. त्याचा कालावधी जानेवारी २०२३पर्यंत आहे. त्याने या मार्गाच्या
दुरुस्तीचे काम करावे असे पत्र नॅशनल हायवेला देण्यात आलेले आहे. परंतु, अजूनही संबंधित ठेकेदाराने काम केलेले नाही.
-राहुल कदम, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रकल्प विभाग
पर्यायी पुलाची मागणी
चाकण-शिक्रापूर मार्गावरील भीमा नदीवरील पूल हा सुमारे ४२ वर्षाचा आहे. हा पूल अरुंद आहे. पंचवीस फूट रुंदीचा आहे. या पुलावरून दोन अवजड वाहने कशीबशी जातात. या अरुंद पुलामुळे पुलावर वाहतूक कोंडी सातत्याने होते या पुलाला नवीन पर्यायी पूल करण्याची मागणी नागरिक करत आहेत.