
गायरान बचाव कृती समितीतर्फे १२ डिसेंबरला राजगुरुनगरला मोर्चा
चाकण, ता. ७ : खेड तालुक्यात विविध गावांमध्ये गायरानात अतिक्रमण केलेल्या अतिक्रमणधारकांना शासनाकडून नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. यामुळे अतिक्रमणधारक भयभीत झाले आहेत. ‘अतिक्रमणे जमीनदोस्त होणार की काय’ हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. अतिक्रमणधारकांचे प्रश्न मांडण्यासाठी ‘गायरान बचाव कृती समिती’च्या वतीने खेड प्रांत कार्यालयावर येत्या १२ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती गायरान बचाव कृती समितीचे समन्वयक मनोहर वाडेकर, बाळासाहेब चौधरी यांनी दिली.
उच्च न्यायालयाचा निकाल झाल्यानंतर गायरानाचा प्रश्न जटिल झाला आहे. शासनाने याबाबत कुठलीही ठोस भूमिका न घेतल्याने अतिक्रमणधारकांमध्ये नाराजी आहे. गायरान बचाव कृती समितीच्या माध्यमातून अतिक्रमणधारकांचे प्रश्न मांडण्यासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू झाला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत लढा सुरू राहणार आहे, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले. याप्रसंगी ॲड. नीलेश आंधळे, काळुराम कड, सचिन पानसरे, गौरव परदेशी आदी उपस्थित होते. अतिक्रमणधारकांनी त्यांच्या सहकुटुंब मोर्चासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
.